कन्फेशन....
आयुष्य जगताना कळत नकळत झालेल्या चुकांची कबुली फादर जवळ देण्याची सुंदर पद्धती ख्रिश्चन धर्मात आहे. बिनचूक कोणीच नसते. नेहमीचे सरळसोट आयुष्य जगताना काही चुका होतच असतात.आपण खोटे बोलत असतो, कोणावर तरी अन्याय करत असतो.भावनेच्या भरात अनेक चुका होतात.पण काही काळाने आपली चूक कळते..त्याचा पश्चाताप होतो,गिल्ट वाटत रहाते..
माफी मागावीशी वाटते,पण समोरच्या माणसाचे काळीज येशूचे असेलच असे नाही.मग नाती तुटतात ती कायमची...अगदी परत जुळली तरी त्याचा सांधा दिसत रहातो... नात्यातल्या उस्फुर्तपणा संपून जातो..नाते केवळ निभावले जाते..
काही वेळा तर खरं बोलण्याची किंमत अश्वत्थाम्याची जखम देवून जाते..मग खरं बोलण्यापेक्षा खोटं बोलून नाती सुखद ठेवली तर गैर काय ते असे वाटून जाते..
खरं म्हणजे खोटं बोलल्याचा खरोखरच पश्चाताप होत असेल आणि त्याचे कन्फेशन कोणी देत असेल तर त्याला अजूनच जवळ घेणं गरजेचे असते..पश्चातापाचे अश्रू डोळ्यात असलेला माणूस लहान मुलासारखा निर्मळ असतो.. तो ज्याअर्थी कन्फेशन देतो त्या अर्थी तो तुम्हाला जपत असतो. तसे नसते तर तो खोट्याची कबुली कशाला देईल?
माफ करताना सुद्धा वरवर माफ केले म्हणू नये..मेंदूच्या हार्ड डिस्क मधून राग द्वेषाच्या फाईल्स पर्मनंटली डिलीट केल्या पाहिजेत..
पश्चातापदग्ध मन हे देवाचे वेगळे रूप आहे त्याला जपलं पाहिजे..
© प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment