आपण किस झाड की पत्ती...
मी एवढा चांगला किंवा चांगली तर माझ्याच नशिबात हा त्रास का? मी एवढं लोकांचे करतो किंवा करते तर माझ्याच नशिबात असे का? चांगलं वागून उपयोग काय? असे जेव्हा वाटायला लागतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण आठवा.. जन्मापासून संकटे अंगावर घेणाऱ्या त्या बिचाऱ्या कृष्णाला धर्मसंस्थापनार्थाय काय काय करावं लागलं..पण एवढं सगळं करून शेवटी त्याला काय मिळालं ? तर गांधारी कडून कुलक्षयाचा शाप..म्हणजे कौरव मेले आपल्या कर्माने पण ब्लेम कोणावर ? तर कृष्णावर..वात्सल्यसुद्धा किती स्वार्थी असतं ना.. गांधारीच्याच कशाला तुमच्या आमच्या डोळ्यावर पण मोहाची पट्टी असतेच की... आपण तरी आपले दोष कुठे पहातो? आपल्या वाईट परिस्थितीचे खापर इतरांवर , समाजावर फोडायची वृत्ती जुनीच आहे .
गांधारीच्या शापानंतर कृष्ण चिडला? वैतागला? दुःखी झाला? डिप्रेस झाला? रडला? नाही हो तो फक्त हसला..त्याने तो शाप स्वीकारला..जसे कौरव आपल्या कर्माने मेले तसेच यादव पण आपल्या कर्माने मरणार आहेत हे त्याला कळले होते.. कर्तृत्ववान आणि कष्टाळू माणसाच्या पुढच्या पिढ्या आळशी, अहंकारी आणि शून्य कर्तृत्वाच्या निघतात हे सत्य कालही होते आणि आजही आहे..यादव माजले होते,अहंकारी झाले होते ते कृष्णाला पण जुमानत नव्हते त्यामुळे त्यांचा विनाश अटळ होताच..कर्म सिद्धांत सांगणाऱ्या कृष्णाला हे माहीत होते म्हणून तो फक्त हसला..गांधारी फक्त निमित्त होती यादवांचे भागधेय यादवांनीच लिहून ठेवले होते..त्यात खुद्द कृष्णाला सुद्धा हस्तक्षेप करता आला नाही..तिथे आपली तुणतुणी कुठे वाजवता..नुसते हरे राम हरे कृष्ण करून कृष्ण समजत नाही..तो समजून घ्यावा लागतो..
-©प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment