Ad

Wednesday, 29 March 2023

ग्रीष्म

ग्रीष्म..

तास मिनिटे आणि सेकंद
दिवस करतोय रवंथ..
ना वळणे ना कसल्या लाटा
जीवन वहाते संथ संथ

वठले वृक्ष सुकल्या वेली
गायब झाला कुठे बहर
 रस्त्यातून अन रानातून
केवळ ग्रीष्माचा कहर कहर

चोची उघड्या चिऊ काऊंच्या
 थेंबासाठी  अखंड वणवण
काळोख्या बावडीतून झिरपे
पाण्याऐवजी उन्हच कणकण

दूर तिथे क्षितिजावरती
केविलवाणा ढग एकटा 
अस्थिपंजर जणू म्हातारा
मोजतो बसला अंतिम घटका

पारंब्यांचा पसरून पसारा
पाणी शोधतो तो वड पाताळी
पण उन्हे झेलत तरी हासत
ओढ्याकाठी उभ्या बाभळी

लपलप करीत जीभ मोकळी
दारात पसरले श्वान  बिचारे
गुण गुण करीत भ्रमर एकटा
उगाचच कुठे खांब पोखरे

ऊन्हातूनच ऊन पाझरे
उन्हाचाच पूर भयंकर
कुठून न कळे निपजती
उन्हाचेच भोवरे भरभर

उत्तरायणाची करीत प्रतीक्षा
शरपंजरी निजला भीष्म..
तशीच सृष्टी करे प्रतीक्षा
परतून जाईल कधी हा ग्रीष्म

- प्रशांत शेलटकर
  8600583846

Tuesday, 21 March 2023

हे काय भलतेच..

आरशासमोर उभा मी
चक्क तू माझ्या जागी
कसले हे भास म्हणावे
प्रीत का उमलते मनी

हे वय नव्हेच प्रेमाचे
सांगतो मनाला पुन्हा पुन्हा
तरी का घडतो नकळे
प्रमाद हा पुन्हा पुन्हा

नावाचा तुझ्या, मनी रुजवा
नकळे कधी अवचित झाला
मन हे कानात सांगते माझ्या
ऋतू प्रेमाचा आला रे आला

चाललीस काट्यातून खूप तू
चाल आता माझ्या पावलांनी
अबोल गेली जिंदगी तुझी
बोल आता ग माझ्या स्वरांनी

न स्वप्न माझे भलतेच काही
नको लावूस अंदाज वेगळे
ठेवून लक्ष्य भलतेच काही
न करतो मी कौतुक सोहळे

आजवर नाहीच कळले मला
मी का उगाच मोहरून येतो
बोलताना तुझ्या सवे ग
शब्द शब्द कविता  होतो

सूर लागता लागता भैरवीचे
का सर्व अवचित थांबले..
वाटते मैफिल कुठे सुरू झाली?
तानपुरे तर आत्ताच लागले..

असलीस जरी तू  दूर देशी
खंत त्याची मुळीच नाही
प्रेम अनुपम तुझ्यावरती ग
बस्स नको मला दुसरे काही..

- प्रशांत शेलटकर ❤️

8600583846

Sunday, 19 March 2023

राधा...



अधीर मी तुज मिठीत घेण्या
परी तू माझी कुठे?
परी तू दुसऱ्याची जरी
मनास या भीती कुठे?

 पण कल्पनेचे इमले माझे
थाम्बतात ते तरी कुठे?
कल्पनेतल्या मिठीतले शहारे
तुला तरी कळतात कुठे?

धग ओठांतली पिऊनही
ही तहान शमते कुठे?
आग आगीला शमवते
हे तरी तुला कळते कुठे?

अर्ज किया है मी म्हणालो
तू इर्शाद केले कुठे?
गझल तयार डोळ्यात माझ्या
तू अद्याप गायलीस कुठे?

मी अफाट बोलतो तुझ्याशी
पण ते शब्द बोललो कुठे?
पण जे बोललो नजरेने
ते तरी तू ऐकलेस कुठे?

जो वरी न भेटे राधा
बासरी ओठांस कुठे?
अनय अडथळ्यास का
राधा जुमानते कुठे?

- ©प्रशांत ◆◆

Saturday, 18 March 2023

व्यक्ती स्वातंत्र्य



प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते.पण त्यांचा समुदाय बनला की बंधने येतात. परस्परांच्या गरजा भागवताना व्यक्तिगत स्वातंत्र्याला थोडी मुरड घालावी लागते.जो पर्यंत आपल्या देशात कृषी संस्कृती होती तोपर्यंत समाज एकसंघ होता एकमेकांच्या गरजा भागवणे एकमेकांवर अवलंबून असल्याने इच्छा असो वा नसो एकत्र रहावे लागत होते. व्यक्तीगत स्वातंत्र्याचा संकोच , नाविन्याचा अभाव हे दोष असले तरी व्यक्तीला सुरक्षा होती.
    आज प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे.कारण आर्थिक शक्ती आणि त्यामुळे इतरांवरचे अवलंबित्व कमी होत गेलं आहे. आर्थिक ताकद असल्याने खूपशा गोष्टी सहज मॅनेज होतात. पण त्याच बरोबर इगो तिखट होत गेला आहे.मी आणि माझं यात गुंतत चाललो आहोत आपण.
    मी आणि माझं विश्व यात कोणी यायचं हे मी ठरवणार.इतरांशी देणे - घेणे नाही. इतरांशी बॉंडिंग असण्याचा प्रश्नच नाही कारण बॉंडिंग ज्यासाठी करतात ते कारणच संपूष्टात आलें आहे..न मला तुझ्याकडून हवंय ना मी तुला काही देणार.लग्न सुद्धा अगदी प्रोफेशनल व्ह्यू ठेऊन जमवली जातात.त्यात गैर अजिबात नाही. व्यक्ती स्वातंत्र्य ही समाजाची परमोच्च पातळी असते.
     पण सर्व समाजाचा विचार केला तर व्यक्तिस्वातंत्र्याच सर्वोच्च यश काही समुदायानी प्राप्त केले आहे.पण काही समुदायांचा प्रवास उलट्या दिशेने चालू आहे. अजूनही त्याना वाटते पृथ्वी सपाट आहे. विशेष म्हणजे हे समुदाय व्यक्ती स्वातंत्र्य मानत नाहीत तरी त्यांची संख्या वाढत आहे. 
     स्वतंत्र विचारशक्ती असलेला समुदाय झपाटयाने कमी होतोय. आणि झुंडीची मानसिकता वाढत जातेय. व्यक्तीस्वातंत्र्य जपणारी माणसे स्वतःभोवती एक वर्तुळ आखून सेफ रहाणे पसंत करतात. त्यामुळे झुंड आली की एकाकी पडतात आणि संपून जातात. सर्व भल्या बुऱ्या गोष्टी माणसाच्या अस्तित्वाशी येऊन थाम्बतात. व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गोष्टींना तुमचे अस्तित्व शिल्लक राहिले तरच   महत्व आहे.
       व्यक्ती स्वातंत्र्य जपायचे तर समविचारी व्यक्तींनी एकत्र येणे आवश्यक असते.पण एकत्र आल्यावर व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करावा लागतो .अशी गंमत असते. कम्युनिस्ट लोक मार्क्सवादी, लेनिनवादी,रॉयवादी अशा विविध गटात विभागले जातात . भारतात सुद्धा कॉम्रेड डांगे हे नंतर बाजूला फेकले गेले. ही फक्त उदाहरण दिली आहेत. प्रत्येक क्षेत्रात हेच आहे.प्रखर बुद्धिवादी एकत्र येत नाहीत.पण मंदबुद्धी चटकन एकत्र येतात.
      शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य ही बाब उच्च मानवी मूल्य जपणारी असली तिचे अस्तित्व मंदबुद्धी मिटवू शकतात.

- प्रशांत शेलटकर

मागणे

मागणे...

पुस्तकांचे विश्व माझे
त्यातच मला मस्त रमू दे
प्रगल्भतेची एकेक पाकळी
हळूहळू अलवार उमलू दे

व्यक्त होताना स्थळ काळाचे
भान ते अचूक असू दे
बुद्धिवादी तर्कशक्तीला
भावनेचा अंकुर असू दे

ठायी ठायी रडत रहाणे
आता हे संपून जाऊ दे
काळोख दाटला तरी
 एक पणती तेवती असू दे

सगळेच कळत नाही
हेच एकदा कळून जाऊदे
व्यक्त होताना मर्यादांचे
उल्लंघन मात्र कधी नसू दे

जे नव्हतेच आपले
मोह त्यांचा कधी नसू दे
जे खरे आपलेच आहे
ते कळण्याचे भान असू दे

मत प्रत्येकाचे असो वेगळे
मनी समभाव असू दे
मत वेगळे पण शत्रू नव्हे तो
हृदयात स्नेहभाव वसू दे

जगण्याचे अनेक हेतु
खरा हेतू आता कळू दे
विवेकाच्या ओंजळीमध्ये
ज्ञानदीप सतत असू दे

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday, 13 March 2023

एक्झिट..

एक्झिट...

मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
मी एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर

मंचावरची मोहक पात्रे
खूणावत आहेत
त्यांच्याप्रमाणे मीही
फासावेत रंग आणि
फसवत रहावे जगाला
आणि स्वतःलाही
वीट आला त्याचा
म्हणूनी मी असा
तटस्थ बसलोय
एकटाच....

मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
मी एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर...

तू आणि मी वेगळे कुठे?
भूमिका मला म्हणाली
अरे बापरे किती
भेसूर हसलोय मी..
त्याचाच इको मला
भीती घालतोय..
आणि हल्ली हल्ली
माझेच इको मला
घाबरवतात..
दचकवतात..
अस्वस्थ करतात
म्हणून मी इथे
एकटाच ...

मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
 एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर...

रंगमंचावर..
मुखवट्यांची गर्दी
असली मुखवटे
नकली मुखवटे..
स्वार्थाची खरूज खाज
अंगभर पसरलेली
विकारांचे अमर विषाणू
विचारांना पोखरत 
पार मेंदूपर्यंत पोहोचलेले
माझाच क्लोन समोर
रंगमंचावर ..आणि 

मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
मी एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर

डोळे मिटले तरी
वासना ठिबकते
मिटल्या डोळ्यासमोर
नाचत रहाते
बेलगाम वासना..
तेच आयुष्य
तीच जिंदगी
रोख ठोक..
जसे आहे तसे..
तेच बेसिक इन्स्टिक्ट 
तोच होमो सेपियन डी इन ए
साला माणूस म्हणजे
इंटलेक्च्युअल जनावर
दिसतंय ना मला ते 
मी इथेच आहे...
मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
 एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर...

वीटच आला भूमिकेचा
चेहरा रंगला की
रंग उतरतच नाही..
आत झिरपत जातात साले
पेशी पेशी गुलाम होत जाते
भूमिकेची झिंग चढत जाते
उचकटून फेकून द्यावेसे वाटतात
घट्ट चिकटलेले मुखवटे...
पण ते निघता निघत नाहीत
मग विंगेत उडी मारून
आत्महत्या करतो मी
लोक म्हणाले..
बरा होता ,वाईट झालं
बोलायचच असत ते...
स्क्रिप्ट भिनलिय अंगात..
मी फक्त हसलो...आणि
हलका झालो..
बस्स  

आता मी आणि
 मिट्ट काळोख
आणि मिट्ट काळोख
आणि मिट्ट काळोख
आणि मीच काळोख
मुखवटे झडून गेले
रंग उडून गेले..
पेशी पेशीत रुतलेले
जाणीवेचे बीज जळून गेले
तरीही एक उरलीय
एक अतिसूक्ष्म जाणीव
तो मीच आहे?
की मी तोच आहे?
ही जाणीव आहे की सल?
माहीत नाही.....
आदिम प्रश्नांना उत्तरे नसतात..

-प्रशांत शेलटकर
 8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...