एक्झिट...
मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
मी एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर
मंचावरची मोहक पात्रे
खूणावत आहेत
त्यांच्याप्रमाणे मीही
फासावेत रंग आणि
फसवत रहावे जगाला
आणि स्वतःलाही
वीट आला त्याचा
म्हणूनी मी असा
तटस्थ बसलोय
एकटाच....
मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
मी एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर...
तू आणि मी वेगळे कुठे?
भूमिका मला म्हणाली
अरे बापरे किती
भेसूर हसलोय मी..
त्याचाच इको मला
भीती घालतोय..
आणि हल्ली हल्ली
माझेच इको मला
घाबरवतात..
दचकवतात..
अस्वस्थ करतात
म्हणून मी इथे
एकटाच ...
मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर...
रंगमंचावर..
मुखवट्यांची गर्दी
असली मुखवटे
नकली मुखवटे..
स्वार्थाची खरूज खाज
अंगभर पसरलेली
विकारांचे अमर विषाणू
विचारांना पोखरत
पार मेंदूपर्यंत पोहोचलेले
माझाच क्लोन समोर
रंगमंचावर ..आणि
मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
मी एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर
डोळे मिटले तरी
वासना ठिबकते
मिटल्या डोळ्यासमोर
नाचत रहाते
बेलगाम वासना..
तेच आयुष्य
तीच जिंदगी
रोख ठोक..
जसे आहे तसे..
तेच बेसिक इन्स्टिक्ट
तोच होमो सेपियन डी इन ए
साला माणूस म्हणजे
इंटलेक्च्युअल जनावर
दिसतंय ना मला ते
मी इथेच आहे...
मिट्ट काळोखात
लख्ख रंगमंच..
एकटा..तटस्थ
डोके जाग्यावर
डोळे मंचावर...
वीटच आला भूमिकेचा
चेहरा रंगला की
रंग उतरतच नाही..
आत झिरपत जातात साले
पेशी पेशी गुलाम होत जाते
भूमिकेची झिंग चढत जाते
उचकटून फेकून द्यावेसे वाटतात
घट्ट चिकटलेले मुखवटे...
पण ते निघता निघत नाहीत
मग विंगेत उडी मारून
आत्महत्या करतो मी
लोक म्हणाले..
बरा होता ,वाईट झालं
बोलायचच असत ते...
स्क्रिप्ट भिनलिय अंगात..
मी फक्त हसलो...आणि
हलका झालो..
बस्स
आता मी आणि
मिट्ट काळोख
आणि मिट्ट काळोख
आणि मिट्ट काळोख
आणि मीच काळोख
मुखवटे झडून गेले
रंग उडून गेले..
पेशी पेशीत रुतलेले
जाणीवेचे बीज जळून गेले
तरीही एक उरलीय
एक अतिसूक्ष्म जाणीव
तो मीच आहे?
की मी तोच आहे?
ही जाणीव आहे की सल?
माहीत नाही.....
आदिम प्रश्नांना उत्तरे नसतात..
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment