ग्रीष्म..
तास मिनिटे आणि सेकंद
दिवस करतोय रवंथ..
ना वळणे ना कसल्या लाटा
जीवन वहाते संथ संथ
वठले वृक्ष सुकल्या वेली
गायब झाला कुठे बहर
रस्त्यातून अन रानातून
केवळ ग्रीष्माचा कहर कहर
चोची उघड्या चिऊ काऊंच्या
थेंबासाठी अखंड वणवण
काळोख्या बावडीतून झिरपे
पाण्याऐवजी उन्हच कणकण
दूर तिथे क्षितिजावरती
केविलवाणा ढग एकटा
अस्थिपंजर जणू म्हातारा
मोजतो बसला अंतिम घटका
पारंब्यांचा पसरून पसारा
पाणी शोधतो तो वड पाताळी
पण उन्हे झेलत तरी हासत
ओढ्याकाठी उभ्या बाभळी
लपलप करीत जीभ मोकळी
दारात पसरले श्वान बिचारे
गुण गुण करीत भ्रमर एकटा
उगाचच कुठे खांब पोखरे
ऊन्हातूनच ऊन पाझरे
उन्हाचाच पूर भयंकर
कुठून न कळे निपजती
उन्हाचेच भोवरे भरभर
उत्तरायणाची करीत प्रतीक्षा
शरपंजरी निजला भीष्म..
तशीच सृष्टी करे प्रतीक्षा
परतून जाईल कधी हा ग्रीष्म
- प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment