Ad

Friday, 30 December 2022

"स्वप्नविके"

© प्रशांत शेलटकर यांची पोस्ट.


" स्वप्नविके"


        त्यांच्यामुळे आपला उदरनिर्वाह होत नाही. त्यांच्यामुळे आपल्याला घरदार,पैसा प्रतिष्ठा मिळत नाही. आपण ,आपले कुटुंब, आपले मित्र कधी आजारी पडलो तर त्यांचा काडीमात्र उपयोग नाही ...ते केवळ आणि केवळ आपले मनोरंजन करतात ...मग त्याना आपण एवढे डोक्यावर का बसवतो..? ते केवळ "स्वप्नविके" आहेत..आपण त्याना त्यांच्या औकातीत का ठेवत नाही? 
        त्यातले काही जण देशद्रोही आहेत काही ड्रग्स घेतात ,,काहींनी लोकांना मोटारीखाली चिरडून मारलंय..तरी देखील त्यांचे फॉलोअर्स आहेत ..हा खुळचटपणा नाही का...
         कलाकाराला त्याच्या जागी राहू द्या...कलेचा आदर जरूर करा पण त्याच्या भूमिका आणि ती व्यक्ती यात गल्लत करू नका..ज्या दिवशी कलाकार सामान्य माणसासारखे व्यवहार करतील. त्यांचे पर्सनल लाईफ मीडिया कव्हर करणार नाही , जिमच्या बाहेर उभे राहून अभिनेत्री तिच्या कार मधून उतरली रे उतरली की तिच्या मागे जी जी करत फिरणारे टुकार पत्रकार तिचे शूट करणे थाम्बवतील आणि सामान्य माणसालाही त्याचे देणे घेणे नसणार आहे त्यावेळी आपण माणूस म्हणून प्रगल्भ झालो,आपली लोकशाही प्रगल्भ झाली असे म्हणता येईल.

- प्रशांत शेलटकर
  8600583846

Tuesday, 27 December 2022

आक्रीत...

प्रशान्त शेलटकर यांची पोस्ट...


आक्रीत...

सूर्याला भरली थंडी
चंद्राची झाली आग
गांडूळ काढी फणा
निपचित पडला नाग

विंचू झाले निर्विष
फुलपाखरे करती डंख
चिमणी गेली दिगंती
गरुडाचे गोठले पंख

घुबडे फिरती दिवसा
अन कोकीळ गाते रात्री
कोण कसा वागेल याची
अजिबात नाही खात्री

हरीण फाडते वाघ सिंह
श्वान झाले बेईमान
विसरून सारा गनिमीकावा
कोल्हे दाखविती इमान

अश्व थांबले जागीच 
दौडत धावे गोगलगाय
गवत खातो वाघ बिचारा
मुक्त फिरते जंगलात गाय

समुद्र झाले साखरगोड
नद्या झाल्या खारट फार
मुंगी उडाली आकाशी अन
रांगत रांगत फिरते घार

असे नवल पाहता पाहता
बायको आली माझ्यापाशी
चमकलोच ना तिला पाहता
ओठावर तिच्या गच्च मिशी

अय्या, इश्श हे काय गडे
मी अवचित बोलून गेलो
हे काय बरे विपरीत आता
मी पटकन बोलून गेलो

क्षणात तिने मला पटकन
चिमटा काढला जोरात 
तेव्हाच कळले माझे मला 
मी केव्हाचा अंथरूणात

अरे देवा हे स्वप्नच होते
कळले जेव्हा मला
खरंच सांगतो तपासून मी
पाहिले स्वतःचे स्वतःला

-प्रशान्त शेलटकर
 8600583846

Sunday, 25 December 2022

कशासाठी???

कशासाठी????

कुठेतरी काही तरी
घडत आहे..
कुठेतरी काही तरी
बिघडत आहे...
कशासाठी हे सर्व?
प्रश्न मात्र हा 
 नक्कीच पडत आहे

सर्टिफाय करून 
घेत आहेत..
कोणी त्यांचे
सुंदर चेहरे..
बुद्धिबळाच्या पटावर
कोणी चालवतात
त्यांचे मोहरे...
नेमके कोण सुंदर?
नेमके कोण बुद्धिमान?
प्रश्न मात्र पडत आहे
कुठेतरी काही तरी
घडत आहे..
कुठेतरी काही तरी
बिघडत आहे...
कशासाठी हे सर्व?
 प्रश्न मात्र हा
 नक्कीच पडत आहे

सोशल मिडियाच्या
धोबी घाटावर..
दुखणी त्यांची 
कोणी बडवत आहेत..
शब्दांच्या घालून लाथा
कोणी कोणा तुडवत आहेत
उट्टे काढून एकमेकांचे
का बरे हे नडत आहेत?
कुठेतरी काही तरी
घडत आहे..
कुठेतरी काही तरी
बिघडत आहे...
कशासाठी हे सर्व?
 प्रश्न मात्र हा
 नक्कीच पडत आहे

स्क्रोल करू करू
बोटे झिजली..
रील करू करू
बाई थकली
तरी अफाट लोक हे
का बरे गंडत आहेत ?
कुठेतरी काही तरी
घडत आहे..
कुठेतरी काही तरी
बिघडत आहे...
कशासाठी हे सर्व?
 प्रश्न मात्र हा
नक्कीच  पडत आहे

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Thursday, 22 December 2022

बेडकी

बालगीत-# 1

बेडकी..

टपॉक  टपॉक  उड्या मारत
निघाली एक बेडकी
सोबत होती  तिच्या बरोबर
तिची दोन बारकी

जाता जाता तिने पाहिले
भले मोठे वारूळ
पोरं म्हणाली आई ग
 किती हे मोठे देऊळ

आई म्हणाली पोरांनो
तोंड जरा बंद ठेवा
आत बसला  असेल 
भला मोठा लांब बावा

कल्ला ऐकून बाहेरचा
सापाने उघडली खिडकी
ते पाहून बेडकीला भरली
कायच्या काय धडकी

म्हणाली पोरहो पळा पळा
आला आला काळ आला
खटपट करा धडपड करा
नाहीतर हो जीवावर घाला

भेदरलेली पिल्ले मग
टपॉक  टपॉक पळू लागली
मागे त्यांच्या सापाची मग
सर सर सर सर स्वारी निघाली

क्षणा क्षणाला घटत चालले
त्यांच्या मधले शिल्लक अंतर
पण मुंगूस मामा पाहत होता
जीवन मृत्यूचे ते दृष्य भयंकर

क्षणात येऊन सापासमोरी
मुंगूस मामा उभा राहिला
याद राख पुढे येशील तर
धमकावत तो पुढे म्हणाला

समोर बघता मुंगूस मामा
सापाची त्या बोबडी वळली
जीव घेऊनी मागच्या मागे
खोट लावूनी स्वारी पळाली

"थँक्यू सो मच मुंगूसमामा,"
पोरे एका सुरात म्हणाली
प्रेमभरे मग मुंगुसानेही
मस्तपैकी शेपटी फुलवली

एक धडा शिकून पोरे
परत आपल्या घरात आली
आजचे प्रॅक्टिकल पुरे झाले
बेडकी मग खुशीत म्हणाली

© प्रशांत शेलटकर
 8600583846

Friday, 16 December 2022

नावडतीचे....

नावडतीचे मीठ अळणी.. आणि आवडत्याचे कारले गोड

लोक एवढे मूर्ख कसे असतात की मूर्खपणाचे ढोंग करतात??? मीडिया एखाद्या नेत्याचे  वादग्रस्त वक्तव्य सतत दाखवत असेल तर ते पूर्ण भाषण नेट वरून शोधून ते पूर्ण वाचून.. मागचे पुढचे संदर्भ लक्षात घेऊन , त्या भाषणातले विराम ,स्वल्प विराम लक्षात घेऊन .. वक्त्याच्या   पूर्वायुष्यात घडलेल्या  गोष्टी यांचा अभ्यास न करता कसे काय व्यक्त होऊ शकतात..खूप वेळा वाक्य उच्चारायचा स्वर कसा आहे त्यावर सुध्दा वक्त्याला काय म्हणायचं आहे हे कळत , उदा. आपण शहाणे आहात  हे  एका लयीत आणि खालच्या आवाजात बोललं तर ते एक साधे वाक्य ठरेल पण शहाणे या शब्दावर जोर दिला किंवा शहाणे च्या पुढे च लावला आणि शहाणेच असे म्हटले तर त्या वाक्याचा अर्थ 360 डिग्रीत बदलतो.
      परंतु नावडत्याचे सगळेच नावडते असते आणि आवडत्याचे सर्वच आवडत असते. कार्यकर्त्याने फक्त आज्ञा पाळायच्या असतात त्याने विचार करायचा नसतो हेच खरे.....

© प्रशांत शेलटकर

Saturday, 10 December 2022

उंच उंच झोका..

© pr@shant

उंच उंच झोका...

अनावृत्त मी अनावृत्त तू
अनावृत्तही या  देह भावना..
सुखावून  मी जातो किती!
जरी क्षणिक या कल्पना

असंख्य असंख्य चुंबने तरी
अतृप्त अतर्क्य या वासना
देह भिडता देहास तुझ्या
झंकारते ग ही देह वीणा

श्वास आणि निश्वास तुझे
चेतविती हे  अंग अंग 
मिठीत तुज कवळता
होतो अवघाची एक रंग

जुगलबंदी दोघांची जरी
तरी एक ही लयकारी
देहांच्या दीडदा दीडदा
वाजती अलवार सतारी

लोभस तुझ्या हरकती
घेतेस काही खास जागा
एवढ्यात नको ग समेवर
जुळवू एकेक निवांत धागा

नको विलगू ग जराही
श्वास श्वासात विरघळू दे
ओठांवरचे  चंद्र चांदणे
ओठांत या जरा निथळू दे

या आपल्या खास क्षणांना
फुलपाखराचे पंख लाभूदे
अन सुखाचा उन्मादी झोका
उंच उंच अन उंच जाऊदे

- © प्रशांत शेलटकर
    8600583846

Saturday, 3 December 2022

आयुष्याचे व्याकरण

आयुष्याचे व्याकरण....


आयुष्याच्या मार्गा चालताना काही माणसं अशी भेटतात की त्याना अगदी  " अवतरणात " ठेवावं.... तर काही माणसे आपल्या आयुष्यात का आली याचे एक भले मोठे "प्रश्नचिन्ह" उभे रहाते. असे असले तरी आयुष्याबद्दल वाईट "उद् गार"  काढू नयेत कधी..कधी दमलो ,निराश झालो तर
 " स्वल्पविराम" अथवा " अर्धविराम" घ्यावा पण नाराज होऊ नये..आयुष्य सरळ कधीच नसतं.. कधी पाय ओढणारे "उकार"असतात पण कधी कधी "वेलांटी" ची सावलीपण मिळून जाते..इथे तर अक्षरांचे पण " पाय मोडले"  जातात तर आपली काय कथा? कोणाच्या तरी आधाराचा "काना" घेतल्या शिवाय  जीवन सुखी करायची "मात्रा" मिळत नाही...सगळे -हस्व , दीर्घ सांभाळले तर गैरसमज होत नाहीत..
     हे सगळं "व्याकरण" सांभाळले आणि उत्तर आयुष्यात "अनुस्वारासारखे" अलिप्त राहून आपल्याच जगण्याकडे पाहिले तर जीवन गाथे चा "पूर्णविराम" सुखद होतो नाही का..

☺️☺️☺️☺️☺️

© प्रशांत शेलटकर
    8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...