बालगीत-# 1
बेडकी..
टपॉक टपॉक उड्या मारत
निघाली एक बेडकी
सोबत होती तिच्या बरोबर
तिची दोन बारकी
जाता जाता तिने पाहिले
भले मोठे वारूळ
पोरं म्हणाली आई ग
किती हे मोठे देऊळ
आई म्हणाली पोरांनो
तोंड जरा बंद ठेवा
आत बसला असेल
भला मोठा लांब बावा
कल्ला ऐकून बाहेरचा
सापाने उघडली खिडकी
ते पाहून बेडकीला भरली
कायच्या काय धडकी
म्हणाली पोरहो पळा पळा
आला आला काळ आला
खटपट करा धडपड करा
नाहीतर हो जीवावर घाला
भेदरलेली पिल्ले मग
टपॉक टपॉक पळू लागली
मागे त्यांच्या सापाची मग
सर सर सर सर स्वारी निघाली
क्षणा क्षणाला घटत चालले
त्यांच्या मधले शिल्लक अंतर
पण मुंगूस मामा पाहत होता
जीवन मृत्यूचे ते दृष्य भयंकर
क्षणात येऊन सापासमोरी
मुंगूस मामा उभा राहिला
याद राख पुढे येशील तर
धमकावत तो पुढे म्हणाला
समोर बघता मुंगूस मामा
सापाची त्या बोबडी वळली
जीव घेऊनी मागच्या मागे
खोट लावूनी स्वारी पळाली
"थँक्यू सो मच मुंगूसमामा,"
पोरे एका सुरात म्हणाली
प्रेमभरे मग मुंगुसानेही
मस्तपैकी शेपटी फुलवली
एक धडा शिकून पोरे
परत आपल्या घरात आली
आजचे प्रॅक्टिकल पुरे झाले
बेडकी मग खुशीत म्हणाली
© प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment