Ad

Tuesday, 27 December 2022

आक्रीत...

प्रशान्त शेलटकर यांची पोस्ट...


आक्रीत...

सूर्याला भरली थंडी
चंद्राची झाली आग
गांडूळ काढी फणा
निपचित पडला नाग

विंचू झाले निर्विष
फुलपाखरे करती डंख
चिमणी गेली दिगंती
गरुडाचे गोठले पंख

घुबडे फिरती दिवसा
अन कोकीळ गाते रात्री
कोण कसा वागेल याची
अजिबात नाही खात्री

हरीण फाडते वाघ सिंह
श्वान झाले बेईमान
विसरून सारा गनिमीकावा
कोल्हे दाखविती इमान

अश्व थांबले जागीच 
दौडत धावे गोगलगाय
गवत खातो वाघ बिचारा
मुक्त फिरते जंगलात गाय

समुद्र झाले साखरगोड
नद्या झाल्या खारट फार
मुंगी उडाली आकाशी अन
रांगत रांगत फिरते घार

असे नवल पाहता पाहता
बायको आली माझ्यापाशी
चमकलोच ना तिला पाहता
ओठावर तिच्या गच्च मिशी

अय्या, इश्श हे काय गडे
मी अवचित बोलून गेलो
हे काय बरे विपरीत आता
मी पटकन बोलून गेलो

क्षणात तिने मला पटकन
चिमटा काढला जोरात 
तेव्हाच कळले माझे मला 
मी केव्हाचा अंथरूणात

अरे देवा हे स्वप्नच होते
कळले जेव्हा मला
खरंच सांगतो तपासून मी
पाहिले स्वतःचे स्वतःला

-प्रशान्त शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...