Ad

Friday, 18 March 2022

अतिशुद्ध ...

कार्यालयीन कार्यासाठी, कार्या लयात जाणे..इत्यादी इत्यादी..


सकाळी जाग येते
चलसंज्ञापनयंत्र (मोबाईल) उशाशी पडलेले असते. अर्धवट झोपेत ते मी चालू करतो शुभप्रभात चे अनेक संदेश (मेसेज)आलेले असतात..काही चलचित्रे (विडिओ)पण असतात..त्यातलीच काही परस्पराना  अग्रेषीत (फॉरवर्ड ) करतो.घातक पण वेधक चलचित्रे प्रकाश वेगाने रद्द करतो...आणि उठतो
    दंतधावन(ब्रश केला) करतो शौच (टॉयलेट ला जाऊन करण्याची क्रिया)इत्यादी आवरतो. तिथून मी  मुदपाक खान्यात (किचन) सुधाकराच्या थाटात येऊन बसतो. माझी सिंधू एक कषायपात्र(चहाचा कप) दाणदिशी समोर आदळते .कषायपात्रात पेयाच्या लाटा उसळतात..काही भित्रे ससे त्याला "चहाच्या कपतील वादळ "वगैरे म्हणतात ..खाऊच्या बरणीतून एक शुष्कखाद्यचकती (बिस्किट) काढतो आणि कषायपात्रात बुडवतो. मी फार  दक्ष असतो अशावेळी.. थोडा जरी वेळ गेला तरी..शुष्कखाद्यचकती खाली पात्रात पडून नाहीशी होते.. आणि  तोंडाजवळ नुसती बोटे येतात.. बरं पात्राच्या तळाशी गेलेली शुष्कखाद्यचकती म्हणजे वय झालेली वहिदा रहिमान...म्हणून मी शुष्कखाद्यचकतीचा आस्वाद जपूनच घेतो..
      प्रभातीची खाद्यपूजा उरकून मी स्नानगृहात येतो. आल्या आल्या थेट जन्माला येतानाच्या अगदी आदिम अवस्थेत जातो. हे आदिम अवस्थेत जाणे दिवसातून एकदा स्नानगृहात आणि ग्रीष्मऋतूतल्या एखाद्या "विजगेल्या" असहनीय रात्री किंवा हेमंत ऋतूच्या एखाद्या अतिशीत रात्री जेव्हा ती 
"शयनेषु रंभा वगैरे होते तेव्हा  बरं का...
         विविध प्रकारच्या सुगंधी वड्या माझे स्नान सुसंपन्न करतात.
     माझ्या स्नानोत्तर कार्यक्रमात, रिकाम्या डोक्यावर कंगवा फिरवणे हा एक महत्त्वाचा दैनिक कार्यक्रम आहे. एसटी नाही का पुरेसा प्रवासी भारमान नसताना गावात रिकामी जाते आणि रिकामी परत येते तसा माझा कंगवा उजवीकडून डावीकडे,डावीकडून उजवीकडे ,टक्कलमध्यबिंदूकडून मागच्या बाजूला असा उनाड पोरासारखा भटकतो आणि गप्प  निवांत पडून राहतो..तैलमर्दन हा कार्यक्रम माझ्यासाठी हास्यास्पद झाला आहे. तेलाचे चार थेंब एकमेकांना टाळ्या देत स्काय डायव्हिंग करत कपाळ, गाल अशा उतरत्या भाजणीने चेहऱ्यावर उतरतात  एखादा चुकार थेंब जर डर का मारे टकलावर रेंगाळत राहिला तर बाकीचे त्याला डर के आगे जित है म्हणत..टकमक टकलावरून खाली ढकलून देतात तेव्हा चेहरा "तेलाळ" होतो. कधी काळी माथा केसाळ होता आता तिबेटचे पठार झालंय.. असो...हे असो आता पुढच्या आयुष्यात वारंवार म्हणावं लागणार ...असो 
     पुरेसा (😊) वस्त्रांकीत होऊन मी पादत्राणे ( उगाचच संधी विग्रह ,शब्दाची उत्पत्ती वगैरे करू नका) पायात सरकवतो आणि मी बाहेर येतो..बाहेर माझी स्वप्नं सुंदरी (बाईक-ड्रीम युगा अस नाव आहे तिचे बरं का...)मान तिरपी करून झोपलेली ...प्रारंभकळ (स्टार्टर) दाबून मी स्वप्नसुंदरीला जागे करायचा नेहमीच प्रयत्न करतो.पण माझ्या दुचाकीच्या विद्युतघटातील ऊर्जेचा विलय झाल्याने..दुचाकी फक्त घोड्यासारखी खिंकाळते आणि शांत होते.क्षणभर मला बाजीराव झाल्यासारखे वाटते.. माझं घर मला शनिवार वाड्यासारख दिसायला लागते..माझी काशीबाई ओट्यावर भांडी विसळत असते आणि दूर तिकडे मस्तानी.....असो...
      ..प्रारंभ कळ व्यर्थ झाल्यावर पदपट्टीकेवर (किक)लाथ मारतो तशी दुचाकी चालू होते गतिप्रेरकाला   (एक्सिलेटर) पिळ दिला की दुचाकी वेग घेते...
     मी कार्यालयात कार्यालयीन वेळात कार्यालयीन  कामासाठी उपस्थित होतो....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...