झाकोळ...
सूर्य खिशात टाकले त्यांनी
मग काजव्यांना माज चढला
मग सोडली ढोली घुबडांनी
अन भयकारी घुत्कार केला
युगे युगे जळू जळू..
सूर्य वळचणीला गेले
अन मालकांच्या गच्च मिठीत
संपादकीय ते झोपले...
पिसाटलेला बेभान जथा
गतकाळाच्या खणतो कबरी
गेम कधी कोणाचा करावा
घेतो कोणी कोणाची सुपारी
निर्लज्ज झाली लाज इथे
विनिमयाचा बाजार सगळा
दौलतीच्या छनछनाला
कायदाही फितूर झाला..
आयाळ झडली दातही पडले
नखांचीही गेली धार..
डरकाळी तर दूरच राहिली
घशात उरली थोडी गुरगुर
झाकोळला अंधारही इथे
म्हणे पुण्यभूमी पवित्र ही
अजून वाटते कुणाकुणाला
देव अवतार घेईलही...
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment