# महिला दिन विशेष
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
काही जण असेही म्हणतात की वर्षातून एकच दिवस महिला दिन साजरा करून काय होणार? त्यांना एकच सांगावे.. असे साजरे केलेले दिन वर्षभर ऊर्जेचा बूस्टर देतात. आपण नाही का रोजच वाढत असतो तरीही वाढदिवस साजरा करतोच ना..
खरं तर महिला दिन ही फक्त साजरा करण्याची गोष्ट नाहीये. तो एक सिंहावलोकन करण्याचा दिवस आहे...सिंह जसा काही पावले पुढे गेल्यावर मागे वळून बघतो तस प्रत्येक स्त्रीने गत आयुष्याकडे वळुन पाहण्याचा हा दिवस. आजपर्यंत आयुष्यात काय साध्य केले? स्वतःला स्पेस किती दिली? आपल्याच एखाद्या गरजू सखीला काय मदत केली ? याचा आढावा घेण्याचा दिवस..
गार्गी,मैत्रेयी ते जिजाऊ, लक्ष्मी बाई ते सावित्री ,आनंदी बाई जोशी, ते अगदी सिंधुताई, आणि सुधा मूर्ती पर्यन्तचा हा प्रवास तसा काटेरीच..आणि पुढचा प्रवासही काटेरीच असणार आहे नवीन प्रश्न ,नवीन आव्हाने यांचा मुकाबला करण्यासाठी नवीन जिजाऊ, सिंधुताई,सावित्रीबाई निर्माण व्हाव्या लागतील..आणि हो घरोघरींच्या सावित्रीना साथ द्यायला घरोघरी ज्योतिबा पण निर्माण झाले पाहिजेत.
स्त्री ही नैसर्गिकच पुरुषांपेक्षा बौद्धिकदृष्टीने सरस असते.पण हे बौध्दिक सामर्थ्य कोणत्या गोष्टींसाठी वापरले जाते हे पण महत्वाचे. ते विधायक गोष्टींसाठी वापरले गेले तर उत्तुंग कार्य होत आणि चुकीच्या कामासाठी वापरलं तर सर्वनाश..
महिला दिन साजरा करताना दैवतीकरण अजिबात नको..तिला देव्हाऱ्यात ठेऊन तिची पूजा नको..माणूस म्हणून ती गुणदोषासकट स्वीकारली पाहिजे.
जसे आपण आईला स्वीकारतो अर्थात स्वीकार अस्वीकाराचा प्रश्नच नसतो तसेच पत्नी ,बहीण याना स्वीकारलं पाहिजे. लग्नाळू पुरुषांच्या लग्नाच्या जाहिरातीवर नजर टाका.. सुंदर,गृहकर्तव्यदक्ष,नोकरी करणारी वधू पाहिजे...अरे लग्नाळू मुलगी म्हणजे बिझनेस पॅकेज वाटले का? बरं आपण सुंदर, गृहकर्तव्यदक्ष वगैरे असतो का?
त्यापेक्षा बायको जशी आहे तशी स्वीकारावी ,तिची आणि आईची, तिची आणि बहिणीशी तुलना करू नये.. आई , बहीण हे मटेरिअल वेगळे आणि बायको हे मटेरियल वेगळे.
अजूनही ग्रामीण भागात बायका आपल्या नवऱ्याना मालक म्हणतात. अरे मालक म्हणायला तुम्ही त्यांचे सेवक आहात का? नवरा -बायको म्हणजे संसार रथाची दोन चाके आहेत ना मग यात मालक कुठून आले?
साधं माहेरी जायला पण परवानगी मागतात काही स्त्रिया.. परवानगी मागण्याऐवजी "मला माहेरी जायचं आहे , या या कारणासाठी तेव्हा मी या तारखेला जाणार आहे.तुझं काय मत आहे.आपण चर्चा करू " अस ठामपणे सांगितलं पाहिजे.. उगाच परवानगी मागणे म्हणजे संस्कृती वगैरे जपणे असे वाटत असेल तर अशा संस्कृतीचे विसर्जन केले पाहिजे..
महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री ही स्त्रीचीच शत्रू आहे का? याचे पण मंथन केले पाहिजे. हुंडाबळी मध्ये सासू आणि नणंद यांचा सहभाग मोठाच राहिला आहे. गरीब -श्रीमंत हा देखील कळीचा प्रश्न, घरातल्या मोलकरणीला आपण कसे वागवतो?
आपली एखादी श्रीमंत सखी असेल तर आपण तिच्याशी कसे वागतो?तेच एखादी गरीब सखी असेल तर आपल्या कपाळावर आठ्या पडतात का? किंवा तिला प्रचंड सहानुभूती दाखवून तिला आपण लाज आणतो का? प्रवासात वृद्ध स्त्री, गरोदर बाई हिला आपण चटकन उठून जागा देतो का?शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांबद्दल तिरस्कार नको कित्येक पुरुषी जनावर त्या झेलतात म्हणून इतर स्त्रिया सुरक्षित असतात..अर्थात हे वेश्या व्यवसायाचे समर्थन मुळीच नाही.नरकच आहे तो. अत्यन्त लाजिरवाणी गोष्ट आहे ती..पण आपला त्या अभागी स्त्रियांबद्दल काय दृष्टकोन आहे हे प्रश्न स्त्रीने स्वतःला विचारून पाहावेत...
लास्ट बट नॉट लीस्ट...
जेन्ट्स लोकांनो, आजची स्त्री आधुनिक आहे..स्वाभिमानी आहे, तिला तिचे आत्मभान आले आहे. तिच्या पेहेरावावरून तिला जज करू नका. घरातून बाहेर पडल्यावर सगळ्या स्त्रिया "उपलब्ध" असाव्यात असा हलकट दृष्टिकोन नको, अनाठायी मदत पण नको. तिला अबला वगैरे समजू नका..शारीरिक दृष्ट्या ती तुमच्यापेक्षा सक्षम आहे. ती नाजूका नाही. दिवसभर शेतात काम,नोकरी वगैरे करून ती घरी आल्यावर सुद्धा कामात झोकून देते ...अर्थात हे पुरुष म्हणून आपल्याला लाजिरवाणे आहे. शंभर ठिकाणी हाड मोडावीत अशा वेदना व्हाव्यात अस बाळंतपण असतं.. तुम्हाला काय जातय सांगायला वंशाला दिवा हवा म्हणायला ...आणि हो रात्रीचे नाजूक क्षण जपा..सुख ओरबाडून मिळत नसत...काही वेळा खरंच तिचं डोकं दुखत असत...अशावेळी निमूटपणे डोक्याला बाम वगैरे लावा तिच्या ...कोरडे लव्ह यु नको...कृतीतून ते दिसलं पाहिजे...
सुंदरतेचे दुसरं नाव स्त्री आहे..स्त्री मग ती गोरी असो,सावळी असो, काळी असो,भारतीय असो ,अमेरिकन असो,आफ्रिकन असो,की जपानी चायनीज असो अगदी टुंड्रा प्रदेशातील असो ती सौन्दर्याची उपासक असतेच असते. ती स्वतः ही सजते आणि भवतालही सजवते..
बायको माहेरी गेली की घराची काय अवस्था होते हे पुरुषांनी एकदा पहावेच
जागतिक महिला दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💐💐💐
-प्रशान्त शेलटकर
8600583846