ओझे
कधी कधी चढते मला
अध्यात्माची धुंदी
बसतो पाडत वेळोवेळी
शब्दांचीच बुंदी
दिवस रात्र तोंडात माझ्या
हरी हरी आणि हरी
सुटत नाही तिळमात्रही
मोह माया जरी
कित्येक ग्रंथ वाचले अन
कित्येक केली पारायणे
जप तप असंख्य केले
अन असंख्य तीर्थाटने..
तरी न झाले मन हे शांत
झाली ना चित्तशुद्धी
नुसतेच झाले कर्मकांड
अजून ना स्थिरबुद्धि
वाचून वाचून पोपट झालो
करतो शब्दांचे खेळ
अनुभूती तर कसलीच नाही
कशाचा कशाला ना मेळ
शब्दांची वाजवतो पुंगी
गर्दीचा मग नाग डोलतो
वाटते येड्या लोकांना
याच्या तोंडून देव बोलतो
अध्यात्माचे ओझे आता
फेकून देईन म्हणतो
चार चौघांसारखे साधे सरळ
जगून घेईन म्हणतो
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment