स्ट्रॉ आणि फुगे
एक छोटी वाटी,
त्या वाटीच्या तळाशी पाणी
पाण्यात विरघळलेला साबण चुरा
बाजूला रिकामटेकडा कवी
आणि त्या कवी इतकाच रिकामा
एक लांबलचक पोकळ स्ट्रॉ...
स्ट्रॉ चे एक टोक
वाटीच्या तळाशी रोवून
तितक्याच सफाईने तो
सोडत बसतो हवेत फुगे..
एका मागोमाग एक असंख्य
त्याच्या असंख्य कवितांसारखे
फुगे छोटे, फुगे मोठे...
कविता छोट्या कविता मोठ्या
एक दोन ..पाच पन्नास.. शंभर
कविताही तशाच ..
एक दोन ..पाच पन्नास.. शंभर
सगळ्या फक्त असंख्य संख्या
क्षणभर अस्तित्वाचा
माजोरी दिमाख दाखवून
फुगे विरून जातात..
लाईक चा टिळा लावून
कविताही मग आत्महत्या करतात
आणि एक रिकाम टेकडा कवी
पुन्हा एकदा खुपसतो स्ट्रॉ
वाटीतल्या टीचभर पाण्यात
सृजनाचा साबणचुरा शोधत
नवे फुगे, नव्या कविता
नव्या जाणिवा,नव्या संहिता
अनंत फुगे अनंत कविता
अश्वत्थाम्याच्या जखमेवर
कवितेचा उतारा...
आता वाटीतल पाणी संपतं
आणि वाटीतला साबणचुराही
बाजूला मोडून पडलेला स्ट्रॉ
तसाच लांबलचक ...पोकळ
आणि कवीही त्या स्ट्रॉ सारखाचं
मोडून पडलेला आणि पोकळ
अस्तित्वाचे अहंकार कुठपर्यंत
फुग्यांचे अस्तित्व जोपर्यंत....
पोकळ असले तरीही.......
-प्रशांत शेलटकर
8600583846