आमच्या नगरातील रस्त्यांची फिर्याद
नगरातले तीन रस्ते
पार वैतागून गेले...
फिर्याद आपली आपली
सांगून सांगून दमले
नावात जरी माझ्या
असला पहिला नंबर
तरी माझ्या अंगावरचे
उडून गेले डांबर
मुलं बिचारी माझ्यावरून
जातात कशी अडखळत
भर पावसात माझ्यावरून
ओढा जातो खळखळत
अरे वेड्या एक नंबऱ्या
तुझं एक बर आहे..
माझ्या नावातच सालं
कायम "दोन" नंबर आहे
जिथून सुरवात माझी
तिथेच किती कचरा आहे
कडेलाच संडास आहे
त्याचा कुठे निचरा आहे
मित्रानो जरी असलो तिसरा
तुमच्यापेक्षा किंचित बरं आहे
डांबरापेक्षा खडी जास्त
हे मात्र खरं आहे...
तिघे जरी त्रासलेले
चौथा अगदी मस्त आहे
डांबराची घेऊन चादर
झोपला कसा सुस्त आहे
तिघांपेक्षा चौथ्याची जरा
पंचायतीत वट आहे..
चौथा जरा लाडकाच
तिघांची लाईन कट आहे
ऐकून तिघांच्या कहाण्या
पाचवा मग खवळला
अरे थोडं तरी आहे तुमचं
मी तर अगदी वेगळा
डांबर नाही खडी नाही
दगड धोंडे नुसती माती
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता
गुंग झाली रे मती
वैतागलेले रस्ते मग
मिळुन पंचायतीत गेले
खायला खडी, प्यायला डांबर
लवकर द्या म्हणाले..
कमी आहे खडी माझ्याकडं
अन कमी आहे डांबर
कोणाला आधी देवू ?
तुम्हीच सांगा नंबर..
सरपंचाचे ऐकून उत्तर
रस्ते परत आले..
भानगडच नको म्हणून
गुपचूप बिचारे बसले
तेव्हा पासून नगर बिचारे
झाले आहे निवांत
हाताची घडी घालूनी
विवेकानंदही बिचारे शांत
-प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment