Ad

Tuesday, 30 June 2020

खुळा

अरे सुरू झाला पावसाळा
तुला का कळेना..
विसरून रेनकोट छत्री
घरी ठेऊन आलास ना

शोधून कुठेही आसरा
तू उभा कसाही खुळा
खाजवीत आपले डोके
तू शोधतो विरंगुळा

तुज समोरी चालली माणसे
जी शहाणी निघाली
घेऊन रेनकोट छत्री
ती निघाली सकाळी

तू तोच अतिशहाणा
विना छत्री निघाला
अंदाज पावसाचा 
साफ तुझा चुकला

शिव्या तुझ्या पावसाला
वाहून केव्हाच गेल्या
बाय बाय करून तुला
रिक्षा हसत गेल्या

चमकते वीज जशी
काळीज हलवून जाते
वाटते बायको यमाची
अशी बोलावून जाते

येते बस टम्म फुगलेली
आशा जराशी वाटते
तुषार उडवीत पाण्याचे
ती सुसाट निघून जाते

मग जे दिसेल त्याला
हात दाखवीत बसतो
थांबतच नाही कोणी
जीव कासावीस होतो

मग कसा अवचित तो
पाऊसच थांबून जातो
विजबाईही मग थांबते
जीव भांड्यात पडतो

मग  एखादी रिकामी
बसही थांबून जाते.
पार्सल तुझे मग तुझ्या
सुखरूप घरी जाते

प्रशांत शेलटकर
8600583846






Friday, 19 June 2020

थेंब बाळ

थेंबबाळ


एक होता थेंब अवखळ
फारच त्याची चाले वळवळ
नदीआईच्या कुशीत त्याची
अखंड अविरत चाले चळवळ

रांग मोडून भावंडांची
इकडून तिकडे करे पळापळ
सांभाळताना थेंबबाळाला...
नदीआईची होई धावपळ

वैतागून गेली बिचारी
सुर्यबाबा कडे करी तक्रार
म्हणे या कारट्याला..
चांगलाच द्या हो मार

बाबा मग फारच कोपला
थेंब बाळाच्या धरून बकोटीला
किरणांचे मारीत फटके.
उचलून नेले आभाळाला

 हिरमुसला थेंब बिचारा
कोपऱ्यात मग जाऊन बसला
वरून खालती नदीआईकडे
रडवेला तो पाहत बसला

पाहून त्याला तसे एकटे
ढगआजोबांचे काळीज हलले
मांडीवरती  घेऊन त्याला
थोडा वेळ ते थांब म्हणाले

थंडीचा घालून पायजमा
इतक्यात येईल रे वारामामा
उंचच उंच आपण जाऊ...
करू तिथे मग मस्त हंगामा

इतक्यात झरकन मामा आला
म्हणे पोरांनो लवकर आवरा
स्कायडायव्हिंग करायचय ना
आवरून घ्या रे भराभरा...

थेंब बाळांना घेऊन संगती
मामा जाई वरती वरती
हरखून गेली सगळी बाळे
खाली हिरवी हिरवी धरती

सगळी बाळे अशी बागडती
मामाच्या खांद्यावर झुलती
पण बाळ आपला दुःखी भारी
नदीआईला शोधे खालती

झुलता झुलता दिसे बाळाला
नदीआई ती प्रेमळ वत्सला
मांडीवरून  ढगआजोबांच्या
क्षणांत खाली मग झेपावला

अलगद खाली खाली आला
पार आईच्या कुशीत शिरला
शहाणा माझा बाळ म्हणूनी
नदीआईने गोड पापा घेतला

😌😌😌😌😌😌

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Tuesday, 16 June 2020

आठवणींच्या आधी....

आठवणींच्याही आधी 
तू कधी येशिल का?
विसरण्याअगोदार तुला
स्मृती माझी जाईल का

अक्षर होऊन कागदावर
तू झरकन उतरशील का 
उतरण्याअगोदार कागदावर
ओठांवर या गुणगुणशील का

भेटलीस जर अवचित कधी
ओळख तरी देशील का?
अन पुढे जाऊनी जराशी
मागे वळुन बघशील का?

कधी आरशासमोर असताना
भास माझा कधी होईल का
अन भांगेत सिंदूर भरतांना
पापण्या ओल्या होतील का?

-प्रशांत शेलटकर
8600583846

Thursday, 11 June 2020

न्यूटन गांधी आणि...

लहानपणी तो ...
न्यूटन होता
त्याच्याही परसात असत एखादं
सफरचंदाचे झाड..
तर त्यानेही लावला असता
गुरुत्वाकर्षणा सारखा एखादा क्रांतिकारी शोध...

लहानपणी तो...
आईनस्टाईनही होता
अभ्यासात जरा बरा होता
"ढ "असता तर त्यानेही
शोधलं असतं ते समिकरण
e = mc2  अगदी सहज

लहानपणी तो,
एडिसनही होता
फक्त त्याच्या टिचरने
त्याच्या आईला दिली नाही चिठ्ठी
की अशक्य आहे 
तुमच्या मुलाला मला शिकवणे
भलताच मंद आहे तो..
नाहीतर शोधांची हजार पेटंट
त्याच्याच नावावर असती..

लहानपणी तो..
गांधीही होता पण
त्याला त्याच्या स्कुलबसमधून
कोणी बाहेर फेकलेच नाही
नाहीतर त्यानेही केले असते
त्याचे सत्याचे प्रयोग....

लहानपणी तो...
विवेकानंदही होता..
पण त्याने तर चोख पाठ केलं होतं
अध्यक्ष महाशय आणि पूज्यगुरुजनहो...
मनाच्या तळातुन बंधुभागींनीनो
कधी आलंच माही...

बालपण सरल तस
न्यूटन,आईनस्टाईन
गांधी,विवेकानंद
सगळं अलगद बाहेर पडले
आता तो 
सत्याचे प्रयोग करत नाही
आता त्याला
स्वतःचाही शोध  घ्यावासा वाटत नाही...
सफरचंद झाडावरून का पडत?
शतके उलटून गेली उत्तर मिळून
पण अजून एका  प्रश्नाचे उत्तर
त्याला अद्यापही नाही मिळाले
..
जगावं कसं??????

-प्रशांत शेलटकर
8600583846

Sunday, 7 June 2020

वळीव

वळीव

ग्रीष्मातील एक दुपार
उन्हाची काहिली फार
घरात गुडूप झाली माणसं
पाखरंही झाली बेजार

झाडही कावली फार
सावलीही नाही गार
पान पान तहानलेले
कधी पडेल पाण्याची धार

निपचित पडली अशी दुपार
अवचित आली मग बहार
उगवतीहुन बेफाम दौडत 
आले वळवाचे स्वार

पाचोळा झाला गगनभरार
वारा असा पिसाटला फार
ढगांची पिशवी फाडून तोडून
जमिनीवर आली पहिली गार

उन्हाचा वणवा विझला पार
भिजून गेली अशी दुपार
पान पान चिंब भिजून ओलं
झाडं झालं झिम्माड गार

ढगांना लागली संततधार
ओढ्याला आली मस्ती फार
वाऱ्यावर मस्त झुलताना
पागोळ्या करती नखरे फार

टप टप थेंब गालावर
टप टप थेंव पानांवर
रुजला वळीव धरेच्या कुशीत
आता होईल धरा अशी गर्भार

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846



















Saturday, 6 June 2020

तुझ्या असण्यापेक्षा....


तुझ्या असण्यापेक्षा

तुझ्या दिसण्यापेक्षा
तुझं असणं सुखद आहे
तुझं असणं सुखद आहेच
त्याहून तुझं हसणं सुखद आहे

तुझ्या  हसण्यापेक्षा
तुझं बोलणं सुखद आहे
तुझं बोलणं सुखद आहेच
त्याहून तुझं रुसणं सुखद आहे

तुझ्या रुसण्यापेक्षा
तुझं भांडण सुखद आहे
तुझं  भांडण सुखद आहेच
त्याहून तुला मनवत राहणं सुखद आहे

तुला मनवण्या पेक्षा
तुला सरळ मिठीत  घेणं सुखद आहे
तुझी मिठी सुखद आहेच 
त्याहून मिठीची कल्पनाच सुखद आहे

तुझ्या कल्पनेत रमण्यापेक्षा
तुझं प्रत्यक्ष दिसण सुखद आहे..
तुझं दिसणं सुखद आहेच
त्याहून तुझं असणं सुखद आहे...

तुझ्या असण्यापेक्षा......
😊😊😊😊😊😊

-प्रशांत शेलटकर
 8600583846







त्यांना तसंच जगायचंय

ती काय बोलते त्याच्याशी
तो काय बोलतो तिच्याशी
याचं तुला काय करायचंय
त्यांना अंधारच हवाय ना
तुला का कंदील लावायचंय

ती भेटते त्याला
तो भेटतो तिला
तुझ्या मनात का जळतय
त्यांना अंधारच हवाय ना
तुला का कंदील लावायचंय

तो तिला मिठीत घेतोय
तिलाही मिठीत जायचंय
इथे तुझी का लाही होतेय
त्यांना अंधारच हवाय ना
तुला का कंदील लावायचंय

जस वाटत ना त्यांना
त्यांना तसच जगायचय
मग तुला अस का होतंय
त्यांना अंधारच हवाय ना
तुला का कंदील लावायचंय

-प्रशांत शेलटकर
  8600583846



Tuesday, 2 June 2020

वादळ

एक वादळ मनातलं

कधी कधी
बाहेरच तुफानी वादळ 
आतल्या वादळाला निमंत्रण देतं
मग आतल्या वासनांचा पाचोळा,
विकारांचा भोवरा, सर्वकाही
नेऊन सोडत त्या आदिम सत्याशी
मग सोडून द्यावेसे वाटतात
देहावरचे हक्क,
स्वतःच्या आणि इतरांच्याही...
वासनांच्या लपलप जिभा
थंड पडतात...
विकारांचे फुलते निखारे 
विझून जातात...
हवा हवासा हव्यास
विरून जातो..
दैहिक जाणिवांच्या अडगळीत
गुदमरलेले चैतन्य आर्तपणे
विचारते एक प्रश्न
कोहम ,,,कोहम ...कोहम
प्रश्नांची आर्त तळमळ
पोहोचते त्या वैश्विक चेतनेशी
आणि एका प्रशांत क्षणी
मिळून जाते एक भव्यदिव्य उत्तर
तो तूच आहेस ,तो तूच आहेस..
मग लखलखुन  जातो...
मनाचा गाभारा...
मग उमजून जात की,
आत आणि बाहेर अस वेगळं
काहीच नाही...
पृथ्वी आप तेज वायू आणि देह
वेगळं अस नाही..
ते वैश्विक चेतन आणि दैहिक जाणीव
वेगळं अस नाही...
अनेक जन्म अनेक मृत्यू
त्यात विशेष अस नाही
भोग आणि भोगाची तृप्ती
याला अंत असा नाही...
अत्त दीप भव वा शिवोssहम
यात द्वैत असे नाही..
आणि म्हणूनच
बाहेरच वादळ आणि आतल वादळ
वेगळं अस नाही....

-प्रशांत शेलटकर
 8600583846




..





चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...