वळीव
उन्हाची काहिली फार
घरात गुडूप झाली माणसं
पाखरंही झाली बेजार
झाडही कावली फार
सावलीही नाही गार
पान पान तहानलेले
कधी पडेल पाण्याची धार
निपचित पडली अशी दुपार
अवचित आली मग बहार
उगवतीहुन बेफाम दौडत
आले वळवाचे स्वार
पाचोळा झाला गगनभरार
वारा असा पिसाटला फार
ढगांची पिशवी फाडून तोडून
जमिनीवर आली पहिली गार
उन्हाचा वणवा विझला पार
भिजून गेली अशी दुपार
पान पान चिंब भिजून ओलं
झाडं झालं झिम्माड गार
ढगांना लागली संततधार
ओढ्याला आली मस्ती फार
वाऱ्यावर मस्त झुलताना
पागोळ्या करती नखरे फार
टप टप थेंब गालावर
टप टप थेंव पानांवर
रुजला वळीव धरेच्या कुशीत
आता होईल धरा अशी गर्भार
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment