थेंबबाळ
एक होता थेंब अवखळ
फारच त्याची चाले वळवळ
नदीआईच्या कुशीत त्याची
अखंड अविरत चाले चळवळ
रांग मोडून भावंडांची
इकडून तिकडे करे पळापळ
सांभाळताना थेंबबाळाला...
नदीआईची होई धावपळ
वैतागून गेली बिचारी
सुर्यबाबा कडे करी तक्रार
म्हणे या कारट्याला..
चांगलाच द्या हो मार
बाबा मग फारच कोपला
थेंब बाळाच्या धरून बकोटीला
किरणांचे मारीत फटके.
उचलून नेले आभाळाला
हिरमुसला थेंब बिचारा
कोपऱ्यात मग जाऊन बसला
वरून खालती नदीआईकडे
रडवेला तो पाहत बसला
पाहून त्याला तसे एकटे
ढगआजोबांचे काळीज हलले
मांडीवरती घेऊन त्याला
थोडा वेळ ते थांब म्हणाले
थंडीचा घालून पायजमा
इतक्यात येईल रे वारामामा
उंचच उंच आपण जाऊ...
करू तिथे मग मस्त हंगामा
इतक्यात झरकन मामा आला
म्हणे पोरांनो लवकर आवरा
स्कायडायव्हिंग करायचय ना
आवरून घ्या रे भराभरा...
थेंब बाळांना घेऊन संगती
मामा जाई वरती वरती
हरखून गेली सगळी बाळे
खाली हिरवी हिरवी धरती
सगळी बाळे अशी बागडती
मामाच्या खांद्यावर झुलती
पण बाळ आपला दुःखी भारी
नदीआईला शोधे खालती
झुलता झुलता दिसे बाळाला
नदीआई ती प्रेमळ वत्सला
मांडीवरून ढगआजोबांच्या
क्षणांत खाली मग झेपावला
अलगद खाली खाली आला
पार आईच्या कुशीत शिरला
शहाणा माझा बाळ म्हणूनी
नदीआईने गोड पापा घेतला
😌😌😌😌😌😌
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment