पेन्सिल,खोडरबर आणि शार्पनर
कोण कोणाच्या प्रेमात पडेल
हे काही सांगता येत नाही...
शार्पनर मध्ये काय पाहिलं
हे पेन्सिलीला कळलं नाही
पेन्सिल त्याच्या प्रेमात
आकंठ अशी बुडाली
इतकी जवळ गेली की
सर्वस्व देऊन बसली
प्रेमासाठी कमीपणा
असा घेत गेली
मान गेला सन्मान गेला
तिची उंची कमी झाली
कळलं जेव्हा तिला
आपली फसगत झाली
शार्पनरच्या नादापाई
आपली फक्त सालं गेली
पाणीच आले डोळ्यात तेव्हा
असे काही दाटून...
एकांतात मग तिने
डोळे घेतले पुसून
मग अवचित तिच्या खांद्यावर
पडला एक आश्वासक हात
खोडरबर मोठ्या प्रेमाने
तिच्याकडे होता पहात..
म्हणाला , काळजी नको करू
मी सोबत आहे ना...
तू कर बिनधास्त चुका
मी खोडायला आहे ना..
म्हणाला ,पिसून घेतलंस फार
एकतर्फी प्रेम असच असत
एक करत असतो मजा
दुसर बिचार रडत बसत
आता आपण एक करू
दोघांनी मिळून लग्न करू
आयुष्याच्या कागदावर
मनाजोगी चित्र काढू...
तू काढ मनसोक्त रेषा
चुकलीस तर मी आहे ना
चुकत आणि शिकत
आयुष्य जगायचं आहे ना
पेन्सिलीचे मन तेव्हा
अस आलं भरून
कागदावर मनसोक्त
मग घेतलं फिरून
आयुष्याच असंच असत
कोणीतरी पेन्सिल
आणि कोणीतरी
खोडरबर व्हायच असतं
-प्रशांत शेलटकर
8600583846