देणेकरी
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता परत देण्याचे
खोटे खोटे वायदे करावे...
देणाऱ्याला देव करावे
कधी त्याला कर्ण म्हणावे
घेण्यासाठी देणाऱ्याला
छान असे लोणी लावावे
कधी उद्याच देतो म्हणावे
कधी परवा देतो म्हणावे
वर्षानुवर्षे गेली तरीही
उद्यास न कधी उजाडू द्यावे
देणेकरी रस्त्यात दिसता
त्वरित आपले मार्ग बदलावे
नजर चुकवून त्याची अलगद
मुंडी वळवुनी पळून जावे..
फोन कधी येता त्याचा
आपण रेंज बाहेर जावे
मोबाईल लावून कानाला
हॅलो हॅलो करीत सुटावे.
अवचित येता समक्ष तो
केविलवाणे ऐसें तोंड करावे
उधारी विसरून त्याचीच त्याने
गप्प गुमान मार्गस्थ व्हावे...
गोलमाल करता करता
एक मात्र ध्यानात ठेवावे
देणे आपल्या कुकर्माचे
सव्याज लागते फेडावे...
-प्रशांत शेलटकर
8600583846