Ad

Thursday, 1 August 2019

देव बसला रुसून

देवघराच्या कोपऱ्यात
देव बसला रुसून....
कोणीच पहात नव्हतं तेव्हा
डोळे घेतले पुसून..

मी म्हणालो का रे देवा
बसलास असा रुसून
तुझं भजन म्हणतो ना
तुझ्यासमोर बसून

तुझ्यासाठी देवा बघ
काय काय केलं...
सागवानी देव्हाऱ्यात तुला
सिंहासनी बसवलं..

तुझ्यासाठी देवा बघ
किती फुले आणली
सोन्या चांदीची देवा
आरास बघ केली

तुझ्यासाठी देवा बघ
पंचपक्वान्न केले...
शुद्ध तुपाचे देवा
निरंजन लावले...

तरी देवा असा कसा
तू बसतोस रुसून...
आशीर्वाद दे ना रे
गालात जरा हसून

देव म्हणे मग मला
देव तुला कळला नाही
पेढ्यांची लाच घायला
मी भ्रष्ट झालो नाही

दीन झाले आईबाबा
त्यांना जरा बघ...
अरे वेड्या त्याच आहे
तुझ्या पुरतंच जग...

भजने माझी गातोस रे
किती किती सुंदर...
जाणून घेतले आहेस का रे
माता-पित्याचे अंतर...

माझ्याशी बोलण्यापेक्षा
त्यांच्याशी तू बोल...
त्यांच्याविना माझी भक्ती
शून्य आणि फोल....

म्हातारपण असत बाळा
दुसरं लहानपण...
किती समजून घेतलं तुला
आठव तुझं बालपण...

देव देव करतोस वेड्या
असा मी भेटेन का...
आई बाबा जर उपाशी
मी तुपाशी खाईन का

देव असा बोलला मला
डोळ्यात त्यांने घातले अंजन
दाटून आले अश्रू नयनी
धूसर झाले निरंजन...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  रत्नागिरी
  8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...