गर्दी भलत्या माणसांची
आता मी टाळतो आहे
दर्दी जिवंत भली माणसे...
आता मी जोडतो आहे...
सूर तिथेच सजवावे
जिथे दिलसे दाद आहे
फिर्याद का करावी जिथे
मैफील मुक्यांचीच आहे
आता मात्र सूर माझे ,
मीच सजवीत आहे..
गर्दी भलत्या माणसांची
आता मी टाळतो आहे
इथे इमानाचे उखाणे
बेंइमान घेत आहे
उगाच प्रेमाचे बहाणे
कुणी फरेबी करीत आहे
आता माझ्याच प्रेमात
मी मस्त मश्गुल आहे...
गर्दी भलत्या माणसांची
आता मी टाळतो आहे
करावे उत्तरांनाच प्रश्न
असे बंड करतो आहे
छापलेल्या उत्तरांना
आता नाकारतो आहे...
कधी अस्वस्थ प्रश्नांची
नक्षीच मांडतो आहे...
गर्दी भलत्या माणसांची
आता मी टाळतो आहे
इथे कुणी वेळ पाहुनी
खेळ मांडतो आहे..
कुणी फक्त शब्दांचाच
खेळ करतो आहे
ताळमेळ त्याचा ,
आता लागतो आहे
गर्दी भलत्या माणसांची
आता मी टाळतो आहे....
आता गूढ मौनात मी
अखंड बोलतो आहे..
उलगडून माझाच मी
मलाच पाहतो आहे..
जे न लाभले कधी
ते आता गवसत आहे
गर्दी भलत्या माणसांची
आता मी टाळतो आहे...
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846