कविता..
शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...
ती नसते उभी कधीच स्टेज वर...
मला आत्मभान देत , जागं करणारी
असते माझी कविता..
नेणिवेत ती असतेच सतत तरंगत..
विदेही आणि निराकार..
जाणिवेत येताना कधी ती..
मीटर मध्ये येते..
कधी मुक्तछंद पसंत करते..
शेवटी ती तिचीच पसंती
मी कोण बापडा...
तिचा जन्म रोखणारा..?
माझा बिन रेषांचा चेहरा
कदाचित तिला आवडत नसेल
मग म्हणते अरे बाबा
देते ना तुला एखादी रेष..
तुझ्या चेहऱ्यासाठी...
बरं असत ना रे
एखादी रेष घेऊन जगणे..
जिवंतपणाचे लक्षण असत ते..
ती आली की देऊन जाते
एखादी रेष..
कधी ती कपाळावर देते..
आठी म्हणते ती तिला..
एकदा ती दिली की..
जग विचारते..
काय रे काय झालं?
कविता मला बोलते करते
हे काय थोडके आहे?
कधी कधी ती मूड मध्ये येते
गालावर देते एखादी रेष..
चेहरा किंचित हसतो तेव्हा..
अगदीच खुश झाली तर
अजून एखादी रेषा..
मग लोक विचारतात
का रे एवढा खुश?
काय सांगू त्यांना?
आणि काय करू या कवितेच?
पण ती आली की
मी बाप बनतो..
कित्येक वेळा झालाय अस
ती आली की
वात्सल्य डोळ्यातून वाहत माझ्या
मग विचारते ती
का रे बाबा का रडतोस??
मग तिच्या नवथर मांडीवर
शांत होतो मी..
माझी लेक म्हणते मग
अरे मी आहे ना??
कधी एकट वाटल तर
ब्लॉगभर विखुरलेल्या माझ्या कविता
वाचत बसतो निवांत..
पुन्हा पुन्हा अनुभवतो
त्याच त्याच प्रसववेदना
माझ्या कवितांचे जन्म
मग परततो मी
माणसांच्या जगात
नवी ऊर्जा नवी लय घेऊन
@ प्रशांत