Ad

Saturday, 12 April 2025

ये ना..

ये ना...

देहाच्या हिंदोळ्यावर
वासना झुलतात मनसोक्त
वर वर सगळी संयम समाधी
आत निनादते कामसूक्त

या पेशींना कसे आवरू
जन्म जन्माच्या या भुकेल्या
स्वप्नातच कोमेजून गेल्या
वासनांच्या कोमल कळ्या

अजून सुरू नाही मैफल
अजून सा कुठे लागला
तन जागेवर मन समेवर
चंद्र एकला मातला मातला

मिठीत रिक्त होण्या तुझ्या
पेशी पेशी आतुर झाल्या
घे ना सामावून खोल मला
लाख सतारी आत वाजल्या

अनावृत्त नाजूक देहास तुझ्या
का शाल लाजेची पांघरते
नजरबंदी करून माझीच
तू का उगा नजर चोरते

नको नको म्हणतेस खरी
हवेहवेसे तुला वाटते खरे
उन्हात बसलो जरी सदैव
चांदण्यात रमणे बरे

ये एकदा जवळ अशी तू
तोड लाजेचे सर्व पहारे..
गात्रात भरून घे ऊब जराशी
विझण्या अगोदर देह निखारे

-@शांत ☺️

Friday, 4 April 2025

श्वास माझे ऐक ना...

श्वास माझे ऐक ना...

नकोत शब्द उगाच
श्वास माझे ऐक ना
बोलू कशाला उगाच
डोळे हे बोलतील ना

आस स्पर्शाची कशाला
नजरबंदी ही पुरेशी
तू फक्त जवळ रहा
चांदणे उन्हाचे होईल ना..

ही बट अवखळ तुझी
कितीदा येई गालावर
किती सावरून घेशील
तोल किंचितसा ढळू दे ना

बोलू नकोस काहीच
ही शांतता मखमली
शब्दाविना गझल माझी
फक्त नजरेने ऐक ना

हे मौन किती बोलते
का उगा शब्द उधळायचे
नको ना अशी रोखून पाहू
लटकेच मला रोख ना

-@ प्रशांत..❤️

Thursday, 3 April 2025

पॉझिटिव्ह एकांत..

पॉझिटिव्ह एकांत..

मला हवाय
पॉझिटिव्ह एकांत..
एकांतात पाहायचाय मला,
माझ्यातलाच आकांत..

माझा माझ्याकडे
खोल खोल प्रवास..
मोहाचे अलवार पापुद्रे
अलगद दूर करत..
मी माझ्यातच केलेला
अखंड सर्वदिशा प्रवास..

माझेच नकली मुखवटे
पार करत करत..
त्या पेशीपर्यंत जायचंय
जी असेल निखळ निरागस
लखलखीत सोन्यासारखी..

शब्दांकडून निःशब्दाकडे
पार्थिवाकडून अपार्थिवाकडे
जडाकडून चैतन्याकडे..
अखंड प्रवास करायचाय..

देहांच्या मोहक चौकटीपलीकडे
खूप काही आहे..
देहाचे देहाला दिलेले उत्तर
कापुसकोंड्याचा शाप आहे
पार्थिवाचे मोहक कलेवर
शेवटी ते कलेवरच आहे..

पडलेले प्रश्न
त्याची साचेबद्ध उत्तरे
पुन्हा तेच प्रश्न
तीच तीच उत्तरे..
जिथे प्रश्न नसतील
उत्तरांना प्रश्न नसतील
काय उत्तर असेल ?
हा प्रश्न नसेल 
असा एकांत हवाय मला
पॉझिटिव्ह एकांत..
एकांतात पाहायचाय मला,
माझ्यातलाच आकांत..

© प्रशांत..

Monday, 24 March 2025

बाकी शून्य..

बाकी शून्य...

माझ्याच मनाच्या
खोल खोल डोहात
जेव्हा मी उतरतो
तेव्हा त्या डोहाच्या तळाशी
मीच दिसतो 
अगदी अगतिक ,असहाय्य
मान गुडघ्यात घातलेला 
बिनचेहऱ्याचा मी..

सगळीकडे ...
अंधार लपेटून बसलेला अंधार..
उजेडाची भीती असलेला अंधार

मी.... 
चिरदाह मिरवणारा ..अश्वत्थामा
मी ...
वासनांचे गंजलेले बाण ...
भात्यात शिल्लक असलेला  
कौंतेय ...हो कौंतेयच..

 पण मी उतरत नाही आजकाल
माझ्या मनाच्या खोल डोहात
भीती वाटते..
कदाचित मी तिथे नसलो तर?
वेदना मिरवण्याचा ,
अगतिकतेचा ,असहाय्यतेचाही
मोह असतोच ना..
बस्स शून्याला शून्याचा मोह..
 बाकी सर्व शून्यच

-प्रशांत

Tuesday, 18 March 2025

अल्गोरिदम

....आपण जे सतत बघतो ,वाचतो आणि पहातो तेच सोशल मीडिया आपल्याला दाखवतो याचे कारण अल्गोरिदम ..हे बरोबरच..त्यामुळेच आजूबाजूला केवळ निगेटीव्ह चाललेल आहे किंवा आजूबाजूला केवळ पॉझिटिव्ह चाललं आहे, अमूक-ढमूक राजकीय नेता आपला तारणहार आहे/खलनायक आहे. हे आपले आहेत .ते परके आहेत अशी विचारसरणी पक्की होत जातेय.
आपल्या मोबाईलचे नेट चालू असेल आणि आपण सोशल मीडियावर नसलो तरी आपण ज्या गप्पा मारतो त्या नुसार आपल्याला नोटिफिकेशन्स येत असतात.
    प्रिंट मीडिया हा राजकीय पक्षांनी वाटून घेतला आहे. एवढंच कशाला लेखक आणि विचारवंतांचे देखील कळप असतात..ते सतत ब्रेनवॉश करत असतात.
     सोशल मीडिया हे समूह नियंत्रित एक टूल आहे .तुम्ही काय विचार करायचा ,कोणत्या पद्धतीने विचार करायचा ?तुम्ही काय पहायचे? एवढंच नाही आम्ही दाखवतो तेच सत्य कसे आहे..हे सोशल मीडिया ठरवतो
    आपण व्हाटसप, फेसबुक ,इन्स्टाग्राम वापरत नसून आपल्याला हे सोशल प्लॅटफॉर्म वापरत आहेत हे शहाण्या माणसांनी पाहिले पाहिजे..अस मला वाटत..
     -टीप- आणि हे सर्व लिहायला मला फेसबुक किंवा व्हाटसप चाच प्लॅटफॉर्म वापरायला लागतोय..हाच मोठा विरोधाभास  होय

Sunday, 9 March 2025

आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे......

आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे......

  जगण्यातली जिंदादिली...उस्फूर्तता हरवलीय म्हणून आनंद नासून गेलाय हल्ली..आपण जवळपास सगळ्याच गोष्टी केवळ औपचारिकता म्हणून करतोय.
     वाढदिवसाच्या ,लग्नाच्या ,परीक्षेत पास झाल्याच्या शुभेच्छा केवळ द्यायच्या म्हणून देतोय..एखाद्याचे यश आपल्याला रुचेलच अस नाही..पण केवळ जनरित म्हणून शुभेच्छा देतोय..
     लग्नाला गेलो तर    आपण आलो होतो याची नोंद घेतली जावी आणि केवळ कर्तव्य म्हणून आपण पाकीट देऊन येतो..त्यात ना आनंद ना उत्साह..
      जे लग्नाला तेच मयताला..केवळ उपस्थिती लावणे किंबहुना ती दाखवणे हाच शुद्ध हेतू..हाक मारायला जाताना खर तर त्या व्यक्तीचे सांत्वन त्याला दिलासा हाच हेतू असतो.. पण बहुतेक वेळी आपण हाक मारायला जाताना केवळ कर्तव्य हाच हेतू ठेवून जातो.ना डोळे ओले होत.. ना कंठ दाटून येत..

     कोणी आजारी असेल ,तर न जाणे " बरं" दिसत नाही म्हणून आपण त्याला भेटून येतो..एक बिस्किट पुडा दिला की कर्तव्य संपतं आपलं...

    एकूणात आपण आपल्या जगण्यातली  नैसर्गिकता ,उस्फूर्तता हरवून बसलोय..एक कळाहीन ..बेचव आणि दिखाऊ आयुष्य जगतोय आपण..लग्न,मुंजी, मयतं ,बारसं या सगळ्याना केवळ उपस्थिती  दाखवून आपलं समाधान करून घेतो बस्स इतकंच..

-प्रशांत

Saturday, 8 March 2025

तुमचं असं कधी होतं का?

तुमचं असं कधी होतं का?

एका बैठकीत दोनशे पानी पुस्तक वाचून संपवावे म्हणून तुम्ही बैठक मारता आणि चार पाच पान वाचून झाली की अस वाटत की अरे यार बाकीची काम कधी करणार ?  खूप दिवस झाले हार्मोनियम वाजवली नाही..वरचेवर हात बसला नाही तर खराब होईल ती...अरे इस्त्री करायची राहून गेलीय..कपाट लावायचं राहून गेलंय.. मग पुन्हा चार पाच पान वाचून झाली की ऑफिस आठवतं.. तिथली पेंडींग काम आठवतात..मार्च एन्ड जवळ आलाय आपली काहीच तयारी नाही..पुढची चार पान वाचताना लक्षच लागत नाही..व्हाटसप वर काय मेसेज आले असतील..म्हणून पाच मिनिटं बघू आणि ठेवू असा विचार करून व्हाटसप बघतो.. त्यात चॅट करत बसतो तिथून फेसबुक.. तिथून इन्स्टा.. मग एक रील...पुढच रील पुढच रील...मग ते रहाटगाड चालूच..माहितीचे  लोटे मेंदूत रिकामे होत जातात..बिनकामाची माहिती मेंदूत साठत जाते..
       जगाशी सतत कनेक्ट रहायच हे व्यसन एकदम बेक्कार..मेंदू वेठबिगारी होतो..जेमतेम दहा बारा पान वाचलेलं पुस्तक तसंच पान  फडफडवत तिथेच पडून रहात.. केव्हातरी ते उचललं जातं.. बुक शेल्फ मध्ये  ठेवलं जातं..न वाचलेल्या पुस्तकांनी बुकशेल्फ भरून जाते..
       तुमचं अस कधी होत का?

-प्रशांत

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...