Ad

Thursday, 3 April 2025

पॉझिटिव्ह एकांत..

पॉझिटिव्ह एकांत..

मला हवाय
पॉझिटिव्ह एकांत..
एकांतात पाहायचाय मला,
माझ्यातलाच आकांत..

माझा माझ्याकडे
खोल खोल प्रवास..
मोहाचे अलवार पापुद्रे
अलगद दूर करत..
मी माझ्यातच केलेला
अखंड सर्वदिशा प्रवास..

माझेच नकली मुखवटे
पार करत करत..
त्या पेशीपर्यंत जायचंय
जी असेल निखळ निरागस
लखलखीत सोन्यासारखी..

शब्दांकडून निःशब्दाकडे
पार्थिवाकडून अपार्थिवाकडे
जडाकडून चैतन्याकडे..
अखंड प्रवास करायचाय..

देहांच्या मोहक चौकटीपलीकडे
खूप काही आहे..
देहाचे देहाला दिलेले उत्तर
कापुसकोंड्याचा शाप आहे
पार्थिवाचे मोहक कलेवर
शेवटी ते कलेवरच आहे..

पडलेले प्रश्न
त्याची साचेबद्ध उत्तरे
पुन्हा तेच प्रश्न
तीच तीच उत्तरे..
जिथे प्रश्न नसतील
उत्तरांना प्रश्न नसतील
काय उत्तर असेल ?
हा प्रश्न नसेल 
असा एकांत हवाय मला
पॉझिटिव्ह एकांत..
एकांतात पाहायचाय मला,
माझ्यातलाच आकांत..

© प्रशांत..

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...