Ad

Wednesday, 21 January 2026

मध्यान्ह..

मध्यान्ह...

नोकरी करून करून
झाला जेव्हा  टायर्ड 
लोक म्हणतात त्याला 
झाला हा रिटायर्ड...

आयाळ गेली नखे गेली
उरल्या फक्त मिशा
पद गेल रुबाब गेला
आता नसत्या चौकशा

काल होता साहेब मोठा
मिशांना मारे ताव
पायउतार झाल्यावर
कोणी न देई भाव

पगार नाही भत्ता नाही
आता केवळ पेन्शन
मरण्याचे नाहीच आता
जगण्याचेच टेन्शन..

आता करावी का तीर्थयात्रा
फिरून यावे का चार धाम?
की पुन्हा मागावे कुठेतरी
काम देता का काम?

की कराव्या मित्रांसवे
खुशाल मस्त कुटाळ्या 
पण हसताना जपून हसावे
पडतील ना हो कवळ्या

की टाकावे उगा उसासे 
पाहून मॉर्निंग सुंदरी..
की गेले ते दिवस म्हणावे
आणि जावे मंदिरी?

काय करावे आता आपण
हजार येती मनात प्रश्न
ज्याचा त्याचा चॉईस
मातम करावा की जश्न?

अर्धा पेला सरला तरी
अर्धा भरला म्हणावे 
की अर्धाच उरला म्हणुनी
रडत कुढत बसावे..

बोलून गेले श्रेष्ठ कवीवर
जन पळभर हाय हाय
तू गेल्यावर तुझे इथे
उरणार काय काय..

संपले नाही आयुष्य
संपला फक्त एक टप्पा
अजून तुझी वेळ नाही
म्हणेल वरून बाप्पा

एंजॉय करावे आयुष्य
नको काळजी नको चिंता 
पद प्रतिष्ठा असे पर्यंत
साथ देते बघा जनता

फर्स्ट इनिंग संपली आता
दुसरी चालू झाली..
संध्याकाळ कुठे एवढ्यात
आताशी मध्यान्ह झाली..

बर झाल म्हणायच आता
मीच माझा राजा...
अशी जमवू मैफिल
की भैरवीतही येईल मजा..

@ प्रशांत

No comments:

Post a Comment

घर..

घर... माणसंच काय हो  , हल्ली घरं पण  बदलली दार खिडक्या बंद करून आतल्या गाठीची झाली.. पंख पसरलेली दुपाकी घर आताशा अंमळ थोडी थकली पिल्ल तरी आत...