Ad

Thursday, 15 January 2026

प्राणीपण..

प्राणीपण...

फार फार वर्षापूर्वी माणूस 
असाच फिरायचा उघडा नागडा
निद्रा भय आणि मैथुन बस्स..
निद्रा आली की कधीही कुठेही
भिती सर्वांचीच ,एकमेकांची सुद्धा 
आणि मैथुन कोणाशीही कुठेही कधीही..

मग साल त्याच्या लक्षात आलं..
वाघ माकड कुत्रे ,जिराफ रेडे 
कावळे,चिमण्या कासव, लांडगे
आणि आपण ....
यात फरकच नाहीये
आहार निद्रा भय आणि मोकाट मैथुन
सगळे घोडे बारा टक्के इथून तिथून

मग आल्या व्यवस्था...
लग्न.. समाज.. धर्म नियम कानून 
वगैरे वगैरे..
कला संस्कृती, ज्ञान तत्वज्ञान 
वगैरे वगैरे...

घटका गेल्या, पळे गेली
वर्ष गेली,युगे गेली..
प्राणीपणाची पेशी..
खोल खोल गाडली गेली..
व्यवस्थाच चिरेबंदी झाल्या
मर्यादा म्हणजे साखळ्या झाल्या..
बस्स आता बंड पाहिजे
व्यवस्थेविरुद्ध विद्रोह पाहिजे

आता जुने ढासळते आहे.
तटबंदी कोसळते आहे...
एकच जोडीदार शेवटपर्यंत 
कल्पनाच आता छळते आहे..
लिव्ह इन रिलेशन..
पार्टनरशिप एक लिटमस टेस्ट
व्यवस्थाच सर्व टाईम वेस्ट..

प्राणी आहे मी आधी
माणूसबिणूस नंतर
माणसाच्या प्राणीपणाला
कशाला माणूसपणाचे अस्तर 
युग कुस बदलत आहे..
सगळ आतून बदलत आहे..
प्राणीपणाची जाणीव
आता ठासून वर येत आहे..

याचा अंत काय?
कोणास ठाऊक..
आता पुढे काय?
कोणास ठाऊक...
आपण कोण?
प्रवाहातला पातेरा 
जसा नेइल,जिकडे नेईल 
तिकडे वाहत जायचं..
तत्वज्ञानाच्या वेष्टनात
प्राणीपण जपायच..

@ प्रशांत  

.

No comments:

Post a Comment

प्राणीपण..

प्राणीपण... फार फार वर्षापूर्वी माणूस  असाच फिरायचा उघडा नागडा निद्रा भय आणि मैथुन बस्स.. निद्रा आली की कधीही कुठेही भिती सर्वांचीच ,एकमेकां...