देह शुद्ध करुनी भजनी भजावे। आणिकाचे नाठवावे दोष गुण।। धृ ।।
साधने समाधि नको पां उपाधी। सर्व समबुध्दी करी मन।। 1 ।।
म्हणे जनार्दन घेई अनुताप। सांडी पा संकल्प एकनाथा।। 2 ।।
... उपासना म्हणजे काय? हे जनार्दन महाराजांनी या अभंगात उत्तम रीतीने सांगितलं आहे..
देह शुद्ध करूनी भजनी रमावे.. देह शुद्ध करणे म्हणजे फक्त स्नान करणे नव्हे.. तो निरोगी ठेवणे , स्वच्छ ठेवणे.. जी काही साधना देहाच्या माध्यमातून करायची असल्याने तो स्वच्छ ,निरोगी असणे आवश्यक असत..
पुढे ते म्हणतात..आणिकाचे नाठवावे दोष गुण।।
सामान्यपणे माणस एकत्र आली की तिथे उपस्थित नसलेल्या माणसांबद्दल चर्चा चालू होते.. हे टाळल पाहिजे.. साधना करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे गेट टू गेदर नव्हे.. आणिकांचे नाठवावे दोषगुण यात केवळ दोष नाहीये गुण पण आठवू नका.. म्हणजे निंदाही नको आणि स्तुती देखील नको केवळ साधना करण्यावर लक्ष केंद्रित करावे..
पुढे ते म्हणतात..साधने समाधि नको पां उपाधी। सर्व समबुध्दी करी मन।। 1 ।।
साधना करताना कसली उपाधी नको ,उपाधी अहंकार घेऊन येते.. भक्तीचा पण अहंकार असू शकतो,इतकी पारायणे केली,इतके जप केले,इतक्या तीर्थ यात्रा केल्या.. इतके ग्रंथ वाचले.. हा अहंकार आहे तो सोडून सर्व सम बुद्धी झालं पाहिजे..सर्व सम बुद्धी म्हणजे सर्वांच्या ठिकाणी ईश्वर आहे ही भावना मनात ठेवणे.. मग तो माणूस कोणत्याही धर्म जाती पंथाचा असो.. माणूसच नाही सर्व प्राणिमात्रात ईश्वर आहे ही भावना मनात असावी..
शेवटच्या पंक्तीत महाराज म्हणतात..
म्हणे जनार्दन घेई अनुताप। सांडी पा संकल्प एकनाथा।। 2 ।।
अनुताप म्हणजे भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल संबंधित लोकांची क्षमा मागून , पुन्हा त्या चुका करू नये याचा निश्चय करणे.
पुढची ओळ महत्वाची सांडी पा संकल्प एकनाथा.सांडी म्हणजे सोडून दे..भक्ती करण्याचा संकल्प सुद्धा सोडून दे इतक्या उच्च पातळी वर ये एकनाथा..भक्तीचा संकल्प ही पहिली स्थिती झाली,ती चुकीची नाही..पण तिथेच अडकू नये..कारण तिथेही मी संकल्प केलाय हा सूक्ष्म अहंकार आहेच..म्हणून तो सूक्ष्म अहंकार सुद्धा नको..आणि ते सोडल्याशिवाय ईश्वर आणि भक्त यांचे अद्वैत होणार नाही..
नितांत सुंदर अभंग आणि तितकाच सुमन ताईंचा नितळ स्वर..
देह शुद्ध करुनी भजनी भजावे। आणिकाचे नाठवावे दोष गुण।। धृ
.... प्रशांत ☺️