Ad

Saturday, 31 May 2025

घोचू फिलिंग

घोचू फिलिंग

हल्ली मी घोचू असल्याचे फिलिंग येतंय..मला मार्केटिंग शिकल पाहिजे,मला शेअर मार्केटिंग जमलं पाहिजे...मला ए आय नाही जमलं तर मी  चू x आहे..मला डायबेटीस नसला तरी तो झालाच पाहिजे.. अमक्या पावडरी तमक्यात मिसळुन मी माझ्या नरड्यात ओतल्या पाहिजेत..माझा बेड परफार्मन्स ही माझी खाजगी बाब नाहीच्च आहे मुळी.. प्रत्येक पुरुषांन ट्वेन्टी फोर बाय सेव्हन टारझन असलंच पाहिजे.. घरच्या "शीला"वर "जित " मिळवलीच पाहिजे ना मी..आताशा मी नोटीस करतोय की मी जी माती खातोय ना तिचे कारण वास्तू दोष आहे..मी अमक्या ठिकाणी तमक ठेवलं, हे पाडून ते उभं केलं..की झालं..सगळं ठीक असेल तर पूर्वज आहेतच माझे..मला तंगड्यात तंगडी घालून पाडायला.. मग ऑन लाईन गुर्जी आहेतच त्याना शांत करायला..आपण ऑनलाईन, गुर्जी ऑनलाईन आणि आपली पितरं पण ऑनलाईन.. तुमच्या पितरांशी तुम्ही थेट नाही बोलायचं..गुर्जी मस्ट..
.....यु ट्यूब वर मस्त गाणी ऐकताना..हे फुकने मध्येच बोंबलत येतात..भक्तीगीत ऐकताना हे सांगणार शिलाजीत  घ्या..रोमान्सभरी गाणी ऐकताना डायबेटीसच्या पावडरी कानात ओततात..काहीतरी विनोदी ऐकाव तर हे एक्सेल विथ ए आय मेंदूवर मारत बसतात...सगळं काही मजेत असताना हळूचकन वास्तू दोष ,पितृदोष यांचे किडे सोडणार.. 
       मग मेंदू बधिर झाला की आहेच ते हिप्नॉसिस प्रो..चार दिन मे ...वगैरे वगैरे..

- प्रशांत

Wednesday, 21 May 2025

ओलीचिंब

ओलीचिंब..

मिठीत चिंब देह तुझा
अन थेंब पापण्यात 
ओठ गुंतले ओठांत
पाऊस पहिला टिपण्यात

ही झड पावसाची
देते काही इशारा..
का डोळ्यात तुझ्या
उगा लाजेचा पहारा

हा पाऊस बरसतो
बाहेर अन आत मनात
बाहेर चिंब गारवा 
अन काहिली तनात

राहू दे ना थेंब टपोरे 
असेच तुझ्या गाली
देहवळणावरून वळीव
येवो घरंगळत खाली

मिठीत वळीव धरेच्या
धरा तृप्त तृप्त होते
बघ सखे त्यातले काही
सुखद तुला कळते

पाऊस बाहेर पडतो
ओलीचिंब कविता  इथे
शब्द शब्द भिजले इथे
अन तू का लाजते तिथे?

© प्रशांत 🌦️⛈️🌦️⛈️

Tuesday, 20 May 2025

पुस्तकी अंधश्रद्धा सर्वात जास्त घातक..

पुस्तकी अंधश्रद्धा सर्वात जास्त घातक..

सध्या धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा पुस्तकी अंधश्रद्धांना जास्त उत आलाय.. आपल्या विचारसरणीला अनुकूल अशीच पुस्तक वाचायची.. खुश व्हायचं..छाती फुलवायची आणि लोकांना अगदी थाटात विचारायचं अरे हे पुस्तक वाचा म्हणजे खर काय ते कळेल..
     पुस्तकात छापलय...अमक्या तमक्यांनी लिहिलंय...म्हणून हे सत्य आहे ..ही एक प्रकारची अंधश्रद्धाच..आपण जे वाचतो ते कोणत्या काळातल आहे? लेखकाची विचारसरणी कोणती आहे? त्याचे व्यक्ती गत आयुष्य कोणत्या अनुभवातून गेलंय. त्याच्यावर कोणत्या व्यक्तींचा प्रभाव आहे.? त्याने संदर्भ म्हणून कोणते ग्रंथ वाचले आहेत?ते कितपत विश्वासार्ह  आहेत ? त्याने जे लिहिलंय ते आजच्या काळाला किती लागू  आहे?याचा विचार पुस्तक वाचताना करायला हवा..तथागत सांगून गेले की स्वयंप्रज्ञ व्हा..स्वतः विचार करायची सवय ठेवली तर उसन्या विचारांवर पांडित्य मिरवण्याची वेळ येत नाही. 
     माणसांची विभागणी ब्लॅक अँड व्हाइट पद्धतीने कधीच करायची नसते, मूळ माणूस हा अनेक भावना,विचार,गुण आणि दोषांची सरमिसळ असल्याने.माणसांचे संघ,समूह,धर्म, राजकीय पक्ष हे देखील एकसाची ,सरसकट एकाच विचाराचे नसतात. त्यातही परस्परविरोधी आंतरप्रवाह असतातच.
     सम्यक विचार मांडणारी खूप कमी माणसे आणि पुस्तके असतात. एकांगी ,एकतर्फी विचारांची पुस्तके जाणीवपूर्वक प्रकाशित केली जातात. माणसांचे निर्बुद्ध कळप व्हावेत,आणि कळप वाढावेत ते एकदा वाढले की हुकूमशाही असो की लोकशाही सत्तेत येणे सोपं जातं..हे  पाहता कोणताही विचार लगेच न स्वीकारता.. काही काळ अंडर ऑब्झरव्हेशन खाली ठेवला पाहिजे..

-प्रशांत

Thursday, 15 May 2025

बौद्धिक झाकोळ..

राजकीय व्यक्तींबद्दलचा टोकाचा द्वेष एकूण परसेप्शनच बदलवून टाकतो..आपला विचार करण्याचा अँगलच रिजिड बनवतो.. तटस्थता निघून जाते..अलिप्तता निघून जाते..स्वप्नाळू पॉझिटिव्हिटी किंवा स्वप्नाळू निगेटीव्हिटी यात आपण अडकून पडतो.व्यक्ती कशी आहे या पेक्षा  माझ्या मनातल्या प्रतिमेसारखी ती असायला हवी ही भावना इतकी प्रबळ होते की ती प्रतिमा हेच वास्तव वाटते. आणि जे मनात असत तेच आजूबाजूला दिसत जातं अस कुठे तरी मानसशास्त्रात वाचलं होतं..फेसबुक सुद्धा तुमचा सर्च बघून माहितीची पेशकश करत असते.आणि विशेष म्हणजे आपला मेंदू साच्यात अडकला   आहे हेच कळत नाही..
         समविचारी मित्र असणे हे काहीवेळा तोट्याचे असते. दोन समविचारी मित्र असले तर विचारांची बेरीज होते. पण दोन पेक्षा अधिक समविचारी मित्र एकत्र आले तर विचारांचा गुणाकार होत जातो. आपण आभासी विश्वात हरवून जातो.. विरोधी विचाराचे मित्र तुमच्या विचारांची चिकित्सा करतात. तुम्हाला डाऊन टू अर्थ ठेवतात.
          आपल्या मनात जी लाडकी गृहीत असतात त्याला कोणी छेद दिलेलं आपल्याला आवडत नाही.ते स्वतःच्या बौद्धिक अस्तित्वाला आव्हान वाटते. स्वतःची मते म्हणजे वास्तव नसते.मग काहीही करून ते नाकारत बसणे ,ट्रोल करणे , जस आहे तसे न बघता जस हवं तसं पाहिलं जातं.
             टोकाच प्रेम आणि टोकाचा द्वेष हानिकारकच असतो , पण ती नशा इतकी बेमालुमपणे चढत जाते.आपलं  आपल्याला समजतच नाही

 © प्रशांत

Saturday, 10 May 2025

चौकट...

चौकट..

मी एका विचारसरणीचा आहे म्हणजे नेमकं काय आहे?..इतर विचारसरणींच्या फांद्या छाटून मी एका विचारसरणीला वाढू दिलंय.. एका निर्णायक क्षणी मी इतर विचारसरणींवर फुल्या मारल्या आहेत आणि एका विचारसरणीवर टिक मारली आहे.
     माणसाचे कल्याण ह्या एका विचारसरणीने होईल असे मला वाटते म्हणून मी ती स्वीकारली आहे.आणि त्याच विचारसरणीने होईल असे माझे ठाम मत आहे म्हणून इतर विचारसरणी माझ्या मते चूक आहेत. हे मी ठरवून ठेवले आहे. म्हणजेच मी स्वतःचं तर्क स्वातंत्र्य गमावून बसलो आहे. म्हणून मी डावा असतो आणि डावाच रहातो, म्हणून मी उजवा असतो आणि उजवाच रहातो. एकदा का डाव्या किंवा उजव्याच मंगळसूत्र गळ्यात घातलं की त्या मंगळ सूत्राशी एकनिष्ठ रहायच..उजव्याने उजवीकडे पहायचे आणि डाव्याने डावीकडेच पाहायचं..आयुष्यभर उजवेपण किंवा डावेपण मिरवायच..
    श्रद्धा म्हणजे काय? स्वतःच्या तर्कशक्तीचे इंधन संपले की मनात जागृत होणारी शरण्यभावना.. मग ती देवावर असो किंवा फ्रेडरिक हायेक,मिलेन क्रेडो,नोआ नाझार या सारख्या उजव्या विचारवंतावर असो,वा कार्ल मार्क्स, लेनिन,फ्रिड्रीख एंगेल्स,लिओन ट्रॉटस्की,अल्बर्ट कामु यासारखे डावे विचारवंत असोत..शरण्यभावना तीच असते..
     विचारसरणी ही एक चौकट असते. तिला स्ट्रेंथ आणि लिमिटेशन्स दोन्ही असतात.त्या चौकटीत राहणाऱ्यांना ती चौकट अंतिम आणि एकमेव वाटत असते...😊

-प्रशांत..

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...