Ad

Tuesday, 28 January 2025

नाव ठेवायला जागा नाही?

नाव ठेवायला जागा नाही?


घाणेकर , गाढवे,आणि किरकीरेंच्या मुलींना कधी एकदा लग्न होऊन नाव बदलतय अस होत असेल का?

गोडबोले नावाची माणसं भांडत असतील का? आणि भांडली तर कशी भांडत असतील?

हसमुख नावाचा माणूस अंत्ययात्रेला गेला तरी हसतमुखाने जात असेल का?

वाघ नावाच्या मुली सासरी वाघमारेंच्या घरी गेल्यावर मूळ वाघांचे काय होत असेल?

सहस्त्रबुद्धेना शाळेत जायची गरज भासत असेल का?

उपरकर..इश्श हे काय नाव आहे?

हरम या नावातला एक काना कुठेतरी हरवलाय अस नाही वाटत?

पेशवे नावाची माणसे ऑफिसमध्ये न जाता दरबारात किंवा सदरेवर जात असतील का?

पोटफोडे नावाच्या माणसासमोर चिलखत घालून जावे का?आणि डोईफोडे नावाच्या माणसासमोर हेल्मेट घालून जावे का?

जोशी नावाने हाक मारली तर रस्त्यातले चारपाच जण वळून का बघतात?

भोले ओ भोले हे गाणं लिहिणाऱ्या भय्याचा मित्र ,भोळे नावाचा मराठी माणूस असेल का?

सातपुते,विसपुते,अष्टपुत्रे या नांवावर चीन मध्ये बंदी असावी का?

तुम्हला पटेल किंवा ना पटेल ,पण पटेल सगळ्या भारतात पसरले आहेत हे तरी पटेल का?

 या अनेक प्रश्नांच्या खुंटयावर लटकलेला  "शेलटकर"

😃😃😃😃

भांडा सौख्यभरे...भांडलंच पाहिजे...

भांडा सौख्यभरे...भांडलंच पाहिजे...


आरोग्यासाठी भांडण आवश्यक आहे. पूर्वी लोक नळावर, बसमध्ये,ऑफिसमध्ये, शाळे मध्ये,घरात,,दारात भांडत असायची..राग आला, पटलं नाही की तिथल्या तिथे  हिशेब क्लीअर करून मिटवला जायचा..
     त्यामुळे मनातला राग ,द्वेष पटकन डी फ्युज होऊन मनातला वणवा विझून जायचा आणि मन मोकळं होवून जायचं..
      आज काय होतंय की भांडण आपण मॅनर्सलेसच्या वर्गात टाकून दिलंय. मनात राग आणि द्वेष असला तरी तो व्यक्त न करता वरवरचा  शांत हसरेपणा आपण स्वीकारालाय..मी भांडलो किंवा भांडले तर माझी प्रतिमा लोकांत कशी होईल याचीच काळजी लागून राहाते..आपली शांत सुस्वभावी एटिकेट्स वाली प्रतिमा ही फेक असते.आतून आपण रागाने ,द्वेषाने, मत्सराने बेभान झालेले असतो . हा डबल स्टॅंडर्ड घातक असतो मनालाही आणि शरीरालाही..आपल्यातले हे "दोन" वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतात.
     एक तर बोलून मोकळं झालं पाहिजे अथवा मोकळं होऊन बोललं पाहिजे..जे पटत नाही ते बोलून मोकळं व्हायचं ,उदाहरण..मैत्रिणीची साडी आवडली नाही तर आवडली नाही अस सांगावं उगाचच छान आहे वगैरे खोटं खोटं बोलू नये..किंवा काही बोलूच नये..साडी छान नाहीये हे तुमचं अंतर्मन सांगतंय पण मैत्रिणीला वाईट वाटेल (मुळात यात वाईट वाटण्यासारखं काही नाही) म्हणून तुमचं बहिर्मन साडी छान म्हणतंय म्हणजे तुमच्या दोन मनात संघर्ष होतोय.. त्यामुळे मन अस्थिर होतय ,मन एकदा अस्थिर झालं की ते रोगांना आमंत्रण देतंय..
    याचा दुसरा इफेक्ट असा आहे की तुम्ही तुमच्या मैत्रीणीला वास्तवापासून लांब नेताय.तिला कल्पनेत रमवताय..म्हणजे जे नाही ते आहे असे समजणे यातूनच स्वतःची, स्वतःसाठी तयार केलेली फेक प्रतिमा तयार होते.हे सुद्धा घातकच..
      उलट्या बाजूने विचार केला तर जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणी ला तिची साडी सुंदर आहे अस खोटं खोट सांगता तेव्हा ती देखील तुमची साडी किती सुंदर आहे ग ,केवढ्याला घेतली? कुठे घेतली असे खोट्या उत्सुकतेने सांगते तेव्हा ती देखील तुम्हाला कल्पनेच्या खोट्या विश्वात नेत असते..
      पुरुषांच्या बाबतीत पण असेच होत असते.पण विषय वेगळे असतात..मूळ मुद्दा असा आहे की आपण जसे दिसते,जसे जाणवते तसे व्यक्त व्हायला विसरलोय.. लाभ आणि हानीची गणिते डोक्यात ठेवून आपण रिलेशनशिप डेव्हलप करतोय.न जाणो भविष्यात हा माणूस उपयोगी पडेल मग याला का दुखवा..असा प्रोफेशनल विचार करतो आपण..त्यालाच आपण मॅनर्स समजून चाललोय.  त्याचे भले बुरे परिणाम आपण भोगतोय..
     भांडण हा सेफ्टी व्हॉल्व आहे..मनात कोंडलेली वाफ निघून जाण्यासाठी.. म्हणून जे मित्र आपल्याशी भांडतात ते सच्चे असण्याची शक्यता जास्त असते..

   म्हणून भांडल पाहीजे, 
   आभाळ मोकळं झालं पाहिजे
   उगाच ढगांची गर्दी कशाला
   बरसून मोकळं झालं पाहिजे..

©- प्रशांत 😊

Friday, 17 January 2025

वाचाल तर "वाचाल" ??की बहकाल???

वाचाल तर "वाचाल" ??की बहकाल???

पुस्तक हे लेखकाचे आकलन असते,
लेखकाचे आकलन हे देश -काल-परिस्थिती नुसार असते. पुस्तक आवडत म्हणजे नेमकं काय होत? अनेक कारणे असतात,कधी विषय आणि आशय आवडतो, कधी लेखनशैली आवडते, कधीकधी आधीच मनात असलेल्या भूमिकेला पाठबळ मिळते,जगताना आलेल्या कटू -गोड अनुभवाशी जुळणारे धागे त्या पुस्तकात आढळतात ..कधी कधी त्या लेखकाने लिहिलेली अगोदरची पुस्तके प्रचंड आवडलेली असतात त्या प्रभावात त्याचे नवीन पुस्तकसुद्धा आवडून जातात.
    व्यवस्थेचा लाभ घेणारे आणि व्यवस्थेचा त्रास होणार असे दोन वर्ग जगातल्या कुठल्याही देशात, प्रांतात असतातच.त्यामुळे व्यवस्थेच समर्थन करणारी आणि व्यवस्थेशी द्रोह करणारी अभिवाक्ती लेखनाद्वारे होत असते आणि त्याचे मग ध्रुवीकरण होणे अपरिहार्य असतेच. एकदा का हे गट पडले की विवेक मागे पडतो. हे आपले ,ते त्यांचे अशी विभागणी होत जाते.आणि मग कोणत्याही घटनेवर पूर्वग्रह ठेवून व्यक्त होवून जातो आपण..
   एखादा लेखक जेव्हा व्यवस्थेच्या बाजूने लिहितो तेव्हा त्याने व्यवस्थेची पॉझिटिव्ह बाजू पाहिलेली असते आणि ती बरोबर असते पण फक्त तीच बरोबर नसते.ती फक्त एक बाजू असते, जेव्हा एखादा लेखक व्यवस्थेच्या विरोधात लिहितो तेव्हा त्याने त्या व्यवस्थेची निगेटिव्ह बाजू पाहिलेली असते आणि ती देखील बरोबरच असते पण ती देखील एक बाजू असते.त्यामुळे दोन्ही बाजूचे वाचन केले तरच व्यवस्थेचा अंदाज येतो 
    पण तसे होत नाही, उमलत्या वयात भूमिका तयार होत जातात त्याला अनुकूल असेच वाचन होत जाते. त्यातूनच समाजाचे अनेक ध्रुवात ध्रुवीकरण होत जाते. समाज म्हणजे एक बृहद वर्तुळ असेल तर त्यात स्वतःचे वेगळे केंद्र स्थान असलेली अनेक वर्तुळे आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचे परीघ अधिक ताठर आणि बुलंद होत जातं आहेत. याला जबाबदार एकांगी लेखन करणारे लेखक आणि त्याला समर्थन करणारे सोशल मीडिया यात डिजिटल आणि प्रिंट दोन्ही मीडिया जबाबदार आहेतच..आणि स्वतन्त्र विचार करू न देणारी सिस्टीम सुद्धा आहे..

- प्रशांत शेलटकर
   8600583846

Tuesday, 14 January 2025

अध्यात्म आणि कापुसकोंड्याची गोष्ट..

मी म्हणजे "अमुक तमुक नव्हे.".माझं बारसं होण्यापूर्वी मी "अमुक तमुक " नव्हतो..माझ्या आई वडिलांनी माझ्या देहाला व्यावहारिक सोयीसाठी मला "अमुक तमुक " हे नाव दिलंय..माझे शारीरिक व्यवहार आणि मनोव्यापार चालवणारी जी माझ्यात अंतर्भूत ऊर्जा आहे ना खरं तर ती ऊर्जा म्हणजे मी आहे..
   "...ज्या अर्थी विजेचा दिवा लागतोय त्या अर्थी उर्जेचे अस्तित्व आहे..ज्याअर्थी माझे मानसिक आणि शारीरिक व्यवहार होत आहेत त्याअर्थी उर्जेचे अस्तित्व माझ्यात आहे..ज्या क्षणी ऊर्जा निघून जाईल त्या क्षणी लोक म्हणतील हा मेला..
    प्रश्न असे की,
   १. ही ऊर्जा येते कुठुन? आणि जाते कुठे?
   २. ती का येते? आणि का जाते?
    ३. ती स्वयंप्रेरणेने येत असेल तर तिला ऊर्जा का म्हणायच ? घरातील ट्यूब लाईट जेव्हा प्रकाशित होते तेव्हा वीज स्वयंप्रेरणेने ट्यूब प्रकाशित करत नाही. तिला स्विच ऑन स्विच ऑफ करणारे कोणीतरी असतेच.तसे आपल्या शरीरातील  उर्जेचे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणारे कोणी असेल का?
   ४..की हे सगळे ऑटोमोडवर चालू आहे? मग याची सुरुवात कुठून झाली?
   ५. ज्ञानेश्वर म्हणतात की हे विश्व स्वसंवेद्य आहे..म्हणजे स्वतःपासून स्फूर्ती घेऊन स्वतःच निर्माण झालेले..गणितात माहीत नसलेल्या उत्तराला एक्स मानलं जातं..तसंच माउलींनी स्वसंवेद्य एक्स सारख वापरलं तर नसेल?

  ६ जितक खोल जावं तितका तळ लांब जावा हीच मानवी विचार करण्याच्या मितीची मर्यादा असेल का? की जसा मेंदू उत्क्रांत होत जाईल तसे उलगडत जाईल..???

हे आणि अनेक असंख्य प्रश्न..प्रश्नात उत्तर आणि उत्तरात परत प्रश्न..
 ....म्हणजे स्व चा शोध ही कापुसकोंड्याची गोष्ट तर ठरत नाही ना?

-© प्रशांत

Saturday, 11 January 2025

सापडले..

.सापडले....

....त्या जुन्या गोष्टीतले सात आंधळे अखेरीस सापडले..आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी,डावे, उजवे, पुरोगामी आणि प्रतिगामी..हेच ते सात आंधळे..भवतालाच्या हत्तीवर आपल्या आकलनाचे तुंबाड लावीत प्रत्येक जण करत असतो एकमेकांची वैचारिक हजामत...प्रत्येकाचे सेल्फ अटेस्टड परसेप्शन हेच अंतिम सत्य जणू..इटूकल्या त्रिज्येचा पिटुकला परीघ..बुद्धीचा कंपास जितका म्हणून ताणेल तितक त्याचं वर्तुळ..त्या वर्तुळातले त्यांचे त्यांचे  कळप..त्यांचे त्यांचे झेंडे..
     स्पर्शमितीच्या मर्यादेला पूर्ण सत्याचे आकलन कधीच होत नाही .दृष्टीच नसेल तर दृष्टिकोन तरी कुठून यायला? मग केवळ स्पर्शातून उमगलेला हत्ती खांबासारखा,सुपासारखा जाणवला तर त्यात नवल नाहीच..आणि सात आंधळे एकत्र आले तरी एकाच स्पर्श मितीत फिरत रहातील नाही का?....जेवढी त्रिज्या तेवढं वर्तुळ..

-© प्रशांत

Thursday, 2 January 2025

चष्मा..

चष्मा....

मित्रा तुझा चष्मा मला दे
पाहीन ना जग मी
तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच
पण तू ही हे जग बघ ना
स्वच्छ नितळ नजरेने
चष्म्याशिवाय......

हे चष्मेवाले दिसतातना..
नाक्या नाक्यात, 
चौका चौकात,
कधी सभेतून ,
कधी मीडियातून
तर कधी चक्क
 पुस्तकातून सुद्धा...

आकर्षक फ्रेमचे
विविध रंगी चष्मे
लोक चढवतात डोळ्यावर
आणि बघतात हर चीज
डोळ्यावर चष्मा लावून..

मग मेंदूच उतरतो 
डोळ्यावरच्या चष्म्यात
आणि चष्म्याचा रंग चढतो
मेंदूच्या पेशी पेशीत
मग तहहयात बनून जाते नजर भगवी ..हिरवी ..निळी
डावी उजवी वगैरे वगैरे..

मग तहहयात 
चष्मे मिरवलेली माणसे
ओळखली जातात..
कट्टर निष्ठावंत वगैरे वगैरे
मेली तरी चष्मा निघत नाही
त्यांच्या निर्जीव डोळ्यांवरचा
खरं तर नजर निर्जीव होतेच
चष्मा चढवलेल्या क्षणापासूनच

म्हणून मित्रा ..
मी चढविन तुझा चष्मा
माझ्या डोळ्यावर
पण क्षणभरच..
स्वच्छ नजरेला तारण ठेवून
कोणताच चष्मा नकोय मला
कितीही आकर्षक असला तरी
मला माझ्याच नजरेने..
जग पाहायचं आहे..
जेवढे जमेल तेवढं
आणि दिसेल तसं....
बस एवढच मित्रा..

-प्रशांत शेलटकर
 8600583846

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...