Ad

Monday, 30 December 2024

यिअर एन्ड..

आयुष्याचाच एन्ड जवळ आला तर मंथ एन्ड काय किंवा यिअर एन्ड काय सगळं सारखच...

यिअर एन्ड..

ना  हुरहूर ना खंत
सरल जरी वर्ष
गेल्याचे ना दुःख
आल्याचा ना हर्ष

बदलेल फक्त कॅलेंडर
आयुष्य थोडच बदलणार
मागच्या पानावरून पुढे
असंच चालत रहाणार

आता ना कसले स्वप्न
ना ते स्वप्नील डोळे
मागेही अंधार होता
पुढेही सगळे काळे

कोरड्याच शुभेच्छा
ना कसला ओलावा
दुःखाच्या दगडी भिंतीवर
केवळ शब्दांचा गिलावा

साल केवळ बदलते
बदलतात केवळ आकडे
कितीही करा संकल्प
आयुष्य पडते तोकडे

उद्या सूर्य तिथेच उगवेल
जिथे आज उगवला
तीच माणसे तेच जग
फरक कुठे पडला..?

वाटेल हे निगेटिव्ह
असा कसा हा लिहितो ?
पायात असताना काटा
कोण बरे का हसतो ?

चौवीसचे होईल पंचवीस
वर्षं एकाने वाढेल
ना तुमचं ना माझं
कोणाचेही ना अडेल..

रोजच होतो अंत
रोजच नवी सुरुवात
विझला जर दिवा तर
पुन्हा पेटवावी वात.

प्रारंभ जिथे आहे
तिथे अंत नक्की आहे
उगवत्यालाच इथे
मावळण्याचा शाप आहे

दिवस आठवडे महिने
वर्षेही निघून जातील
भातुकलीचे उत्सव सारे
कापरागत उडून जातील..

-प्रशांत

Friday, 27 December 2024

कळत नकळत

कळत- नकळत

आपल्याला काही कळत नाही..हे ज्याला कळलं त्याला खरंच सगळं कळलं..ज्यांना वाटतं सगळं त्यांनाच कळतं ..त्याना खरं तर काहीच कळलेल नसतं..
हे जे लिहिलंय ते जरी कळलं तरी ,काहीतरी कळलंय अस समजायला हरकत नाही..काही माणसं कळलेलं नसताना कळलं असं का दाखवतात ते नकळे.. कदाचित याला काही  कळत नाही अस लोकांना कळलं तर??   अशी भीती त्याना वाटत असावी..पण ज्या गोष्टी कळत नाहीत त्या कळून घेण्याची कळकळ असावी लागते मनात..आपल्या मनातील कळ दुसऱ्याला कळावी आणि दुसऱ्याच्या मनातली कळ आपल्याला कळावी अशी कळकळ असणे वाईट नाही   कळकळ असावी पण कळ लावू नये.आणि कोणाच्या कळीत पण जाऊ नये..
      तुमच्या विषयी कळकळ वाटते म्हणून ही सगळी कळवाकळवी...
       कळावे..

आपलाच 

-किंचित कळलेला प्रशांत

Thursday, 26 December 2024

विसंगत-सुसंगत

विसंगत सुसंगत...

सुसंगती सदा घडो..हो नक्कीच पण वास्तवात विसंगतीच खूप..लग्नाचा सिझन आहे..चार ते पाच लग्न अटेंड केली..बहुतेक जोड्या विसंगत होत्या.. किंबहुना ते तस असतच..बहुतेक जोडपी विसंगतीतील सुसंगत शोधत बोहोल्यावर चढतात आणि संसार यशस्वी करतात..
   आपल्या दैनंदिन जीवनात विसंगत गोष्टीच जास्त.. बुद्धी मत्ता आणि सौन्दर्य एकत्र नांदत नाहीत अस म्हणतात.. अपवाद असतीलही ..निसर्गानेच अग्नी निर्माण केला तसेच पाणी सुद्धा निर्माण केले. उन्हाची काहिली निर्माण केली तशीच बर्फ़ाचा थंडाई निर्माण केली. 
     माणस विसंगती मध्ये सुसंगती शोधत जगतात..जिगसॉचे विखुरलेले अनेक तुकडे विसंगत दिसतात..पण ते विचार पूर्वक जोडले तर त्यातून सुंदर चित्र बनून जाते..त्रागा करत राहिलो तर काहीच होणार नाही..
     भेटलेली माणसं आणि प्राप्त परिस्थिती यात आपण दोषच काढत बसलो तर आपल्या आयुष्याचे चित्र आपण कधीच सुंदर नाही बनवणार..
    टीका करणारी माणसे तुमचे गुरू असतात ती आपल्याला आपले दोष दाखवतात..सुधारण्याची संधी त्यातूनच घ्यायची असते..
    तुमचा मत्सर करणारे..तुमच्या प्रगतीची पावतीच देत असतात. तुमच्याशी भांडणारी लोक मिठा सारखी असतात.. त्यांच्याशिवाय जीवनाची रेसिपी पूर्णत्वास जात नाही..
    सुसंगती हे वरदान आहे तर विसंगती हा आयुष्य समृद्ध करणारा अनुभव आहे..आणि ज्याचा त्याने तो घ्यायचा आहे..
    
© प्रशांत शेलटकर
     8600583846

Wednesday, 18 December 2024

सकारात्मक

पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारची एनर्जी असते..दोन्ही प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यात घडत असतात.सतत सकारात्मक रहाणे अशक्य गोष्ट असते..आयुष्यात नकारात्मक घटना घडणे नैसर्गिक आहे.
   ...प्रश्न इतकाच की आपण सकारात्मक आणि नकारात्मक परिस्थितीला प्रतिसाद कसा देतो..सुख असेल तर आनंदी असणे जितके नैसर्गिक आहे तितकेच दुःखात रडणे नैसर्गिक आहे..दुःख लपवून चेहरा हसरा ठेवणे वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत..दुःखात मनसोक्त रडलो नाही तर शारीरिक आणि मानसिक व्याधी जडतात..
    स्थितप्रज्ञ असणे आपल्या सारख्या सामान्य माणसाचे काम नाही..दुःखाची परिसीमा माणसाला असहाय करते..अशा माणसाला सल्ले द्यायला जाऊ नये..मूकपणे पाठीवर हात फिरवा त्याच्या..बाकी शाब्दिक सल्ले बिनकामाचे असतात..ज्याच्या त्याच्या दुःखाची तीव्रता त्याची त्याला माहित असते..इतरांची उदाहरणे देऊन त्याचे दुःख हलके होत नसते..उलट असे सल्लागार तो माणूस लांबच ठेवतो..

-प्रशांत

Monday, 9 December 2024

गर्दीतले एकटेपण

...

एकमेकांच्या अस्तित्वाची दखल घेतल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. उद्या एखाद्या निर्जन बेटावर सोन्याचा महाल बांधून दिला आणि त्याला म्हटले की रहा तिथे तरी तो रहाणार नाही याचं कारण माणूस हा कळपप्रिय  प्राणी आहे. 
      माणसाला धारदार नखे नाहीत, कोणाला फाडून खाईल असा जबडा नाही, वेगाने पळणारे पाय नाहीत..की शरीरात अफाट ताकद नाही..या सर्व मर्यादांमुळे कदाचित समूहाने रहाणे त्याच्या जीन्स मध्ये आले असावे..त्याला लाभलेले बुद्धीचे वरदान हा देखील यातील एक महत्वाचा फॅक्टर असावा.
     यातला अंतर्विरोध असा की समूहाने रहात असला तरी स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची  प्रेरणा त्याला समूहापासून अलग करत असते.या परस्परविरोधी प्रेरणा माणसाचे जीवनचक्र गतिमान करतात.
     जो पर्यंत अंगात रग असते, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता पीक पॉईंट ला असते तो पर्यंत इतरांची कमी दखल घेतली जाते.माणूस आधी स्वतःला सिद्ध करतो आणि मग समाजाची दखल घेतो. 
     आपल्यातला स्व सिद्ध झाला की हळूहळू तो इतरांची दखल घेतो,लग्नाच्या पंगतीत भरपेट जेवून झालं की माणस कोणाला जिलेबी हवी का ? म्हणून  विचारतात तसे असते हे..
     शाळा सोबत्यांचे ग्रुप बहुधा आयुष्याच्या उत्तरार्धात होतात..अमुक तमुक वर्षाची दहावीची बॅच वगैरे..शाळेपासून आज अखेरपर्यंत एकत्र आहेत असे ग्रुप फार कमी..अर्थात सोशल मीडियामुळे एकत्र येणे तुलनेत सोपे आहे. आज काल माणस प्रत्यक्ष एकत्र येऊ शकत नाहीत ,अंतर,वेळ हे फॅक्टर खूप मॅटर करतात. पण ती उणीव व्हाट्सएप,फेसबुक ग्रुप भरून काढतात समूहाने रहाणे ही माणसाची मूलभूत प्रेरणा असतेच  पण त्यातही गर्दीतले वेगळेपण जपणे, एकटेपण जपणे तरीही एकमेकांची दखल घेत रहाणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे..व्हाट्सपग्रुपवर पोस्ट टाकणारे थोडेच असतात पण स्टेटस मात्र आवर्जून पाहिली जातात. अव्यक्त राहून इतरांच्या भावनांची दखल घेत रहाणे याचे उत्तम उदाहरण काय असू शकते.?
     गर्दीतले एकाकीपण ते हेच..आणि समूहात राहून स्व जपण्याचा अंतर्विरोध तो हाच..

-@ प्रशांत शेलटकर
      8600583846

Saturday, 7 December 2024

त्याग

त्याग..

प्रेम म्हणजे त्याग ...लग्न हा प्रेमाचा अंतिम बिंदू समजत असावेत लोक..बघा ना ,सत्यभामा आणि रुक्मिणी यांनी कृष्णाशी लग्न केलं..पण कृष्णा सोबत त्यांची नावे कोण घेतो?..लोक म्हणतात ते राधे कृष्ण ..राधे कृष्ण.. पार्थिवाला अंत असतो.. अपार्थिव अनंत असते..राधेच प्रेम कृष्ण नावाच्या देहावर नव्हते..कृष्ण नावाचे प्रेमतत्व होते..राधा त्या तत्वाशी लीन झाली ..म्हणून ती कृष्णा सोबत निरंतर जोडली गेली..राधेकृष्ण..राधेकृष्ण

त्यागातच अमरत्वाचे बीज असते.. मिराबाईने कृष्ण कृष्ण करीत देह त्याग केला..कृष्णा वरचे प्रेम सिद्ध करत तिने विष ओठाला लावले..आज मीरा आठवते तिचा पती,तिचे सासर माहेर काळाच्या उदरात गडप झाले..
     रामायण म्हणजे त्यागाची परिसीमा आहे..रामाचा राज्य त्याग..त्याच बरोबर लक्ष्मणाचा राज्य त्याग आणि उर्मिलेचा त्याग..भरताचा सिंहासन त्याग..पुत्रशोकात दशरथाचा प्राणत्याग..वनवासात सगळ्या सुखांचा त्याग..लोकांच्या मनातल्या शंका दूर करायला मनावर दगड ठेवून श्रीरामाने केलेला सीतेचा त्याग..सीतेचा त्याग केल्यावर रामाने केलेला राजभोगाचा त्याग..वचन पाळण्यासाठी सौमित्राने केलेला प्राण त्याग, लव आणि अंकुश या बाळांना रामाच्या स्वाधीन केल्यावर सीतेने केलेला रामाचा आणि स्वप्राणाचा त्याग..आणि शेवटी शरयू नदीत रामाने केलेले आत्म समर्पण...
      आज हजारो वर्षांनंतरही राम लोकांच्या ओठावर आहे ते त्याच त्यागामुळे..
     साहित्यात ज्या जोड्या कधीच एकत्र आल्या नाहीत..ज्यांची लग्ने झालीच नाहीत..अशाच जोड्या लोकांच्या लक्षात राहिल्या..रोमिओ-ज्युलियट, हिर -रांझा, लैला-मजनू- शिरी - फरहाद..वगैरे...
      त्याग स्मरणात राहतो.. भोग विसमरणात जातो..

☺️ प्रशांत

Sunday, 1 December 2024

# १- नावडतीचे मीठ अळणी-

म्हणी...भाषेचा अलंकार..😊

# १- नावडतीचे मीठ अळणी-

या म्हणीत विरोधाभासाचे सौन्दर्य आहे.मीठ हे खारटच असते,तो त्याचा स्थायीभावच असतो तरीही मिठाला अळणी म्हणणे हे तो स्थायीभाव नाकारणे असते. स्वयंपाक करणे हे त्या काळी स्त्रीचे क्षेत्र होते.आजही प्राधान्याने ते स्त्रीचेच राहिले आहे.म्हणून नावडतीचे असे म्हटले आहे,नावडत्याचे मीठ अळणी असे नाही.
    एखाद्या स्त्रीचे काहीच आवडत नसेल तर तिचे मीठ सुद्धा अळणी म्हणणे म्हणजे पराकोटीचा नकार असतो. जी व्यक्ती आवडत नाही तिचे काहीच आवडत नाही. असा त्याचा एकूण अर्थ..राजकारणात ही म्हण अगदी चपखल बसते...अतिशयोक्ती आणि विरोधाभास याचे उत्तम उदाहरण म्हणजे... नावडतीचे मीठ अळणी..☺️

-प्रशांत

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...