Ad

Monday, 30 December 2024

यिअर एन्ड..

आयुष्याचाच एन्ड जवळ आला तर मंथ एन्ड काय किंवा यिअर एन्ड काय सगळं सारखच...

यिअर एन्ड..

ना  हुरहूर ना खंत
सरल जरी वर्ष
गेल्याचे ना दुःख
आल्याचा ना हर्ष

बदलेल फक्त कॅलेंडर
आयुष्य थोडच बदलणार
मागच्या पानावरून पुढे
असंच चालत रहाणार

आता ना कसले स्वप्न
ना ते स्वप्नील डोळे
मागेही अंधार होता
पुढेही सगळे काळे

कोरड्याच शुभेच्छा
ना कसला ओलावा
दुःखाच्या दगडी भिंतीवर
केवळ शब्दांचा गिलावा

साल केवळ बदलते
बदलतात केवळ आकडे
कितीही करा संकल्प
आयुष्य पडते तोकडे

उद्या सूर्य तिथेच उगवेल
जिथे आज उगवला
तीच माणसे तेच जग
फरक कुठे पडला..?

वाटेल हे निगेटिव्ह
असा कसा हा लिहितो ?
पायात असताना काटा
कोण बरे का हसतो ?

चौवीसचे होईल पंचवीस
वर्षं एकाने वाढेल
ना तुमचं ना माझं
कोणाचेही ना अडेल..

रोजच होतो अंत
रोजच नवी सुरुवात
विझला जर दिवा तर
पुन्हा पेटवावी वात.

प्रारंभ जिथे आहे
तिथे अंत नक्की आहे
उगवत्यालाच इथे
मावळण्याचा शाप आहे

दिवस आठवडे महिने
वर्षेही निघून जातील
भातुकलीचे उत्सव सारे
कापरागत उडून जातील..

-प्रशांत

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...