Ad

Sunday 5 February 2023

अवेळ....

अवेळ....

(सदर कथा ही केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे ,अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही. कथेतील प्रसंग, पात्रांची व गावाची नावे काल्पनिक आहेत - प्रशांत शेलटकर)

काळोखाची चादर ओढून धानबावाडी गुडूप झोपली होती. नुकतीच पावसाची एक जोरदार सर पडून गेली होती. अचानक विजेचा एक लोळ कडाssड असा आवाज करीत खाडीत लुप्त झाला.त्या आवाजाने एका सुरात डराव डराव करणारी बेडकं क्षणभर थाम्बली..
     "पडली वाटतं कुट तरी" सुऱ्या स्वतःशीच पुटपुटला ...खरं तर त्या आवाजानेच सुऱ्या धानबाला जाग आली होती.त्याने उशाशी असलेले घड्याळ चाचपले ...अर्धवट किलकिल्या डोळ्याने घड्याळ पाहिले..
"बापरे पाच वाजले..." स्वतःशीच चरफडत तो उठला..बाजूला बायको आणि तिच्या कुशीत त्याच वर्षभराचे पोरगं गाढ झोपलं होतं. 
    "लयच उशीर झालाय" तो परत एकदा पुटपुटला..पायाशी असलेली कांबळ बायको आणि पोराच्या अंगावर घालून तो पडवीत आला.रेजातून बाहेर पाहिले. वातावरणात कमालीचा गारठा होता. नुकतीच सर पडून गेल्याने पावसाचे पाणी झाडांच्या पानावरुन खाली पडत होत त्याचा आवाज सगळीकडे भरून राहिला होता. लांबूनच समुद्राची गाज ऐकू येत होती.
    पाच वाजले तरी अजून कोंबडा कसा नाही आरवला याचा विचार करत तो ओटीवर आला..भिंतीवर च्या बापाच्या फोटोला हात जोडले आणि पडवीत पडलेली पागली (छोटे जाळे) उचलली आणि तो निघाला.. मासे मारायला जाताना बापाच्या फोटोला नमस्कार करून जायची त्याची नेहमीची पद्धत होती..
     घराचे दार लोटून तो अंगणात आला. पाऊस आता पूर्ण थाम्बला होता. आकाशात किरकोळ ढगांची लगबग चालू होती, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र घाईघाईने ढगातून वाट काढत नकळे कुठे चालला होता..
     कोंबडा अजून कसा आरवला नाही याचा विचार करत सुऱ्या खाडीच्या दिशेने निघाला होता..आज पुनव ..भरती आलेली असणार ..खाडीत कुठे पागली टाकायची याचा विचार करत खाडीच्या किनारी कधी आला ते त्याला कळलंच नाही..
      भरती सुरू झाली होती. छोट्या छोट्या लाटा किनारा जवळ करत होत्या.वातावरण कुंद होत..वारा जवळपास पडला होता..इतका तो कधीच पडला नव्हता.लाटांची किंचित सळसळ सोडली तर भवताल अगदी चिडीचूप होता ...इतका तो कधीच नव्हता..
      खांद्यावर पागली टाकून सुऱ्या पाण्यात शिरला त्यासरशी एक थंड लहर त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत सरसरत गेली..कोंबडा अजून आरवला नव्हता...अघटिताची ही चाहूल तर नव्हे.....?
    एकेक पाऊल पुढे टाकत ,खांद्यावर पागलीचे ओझे सावरत सुऱ्या चालला होता..पाणी कमालीचे शांत भासत होते.. पाणीच काय बाजूची झाडे देखील अगदी स्तब्द्ध उभी होती..नेहमीच्या टिटव्या कुठे गायब झाल्या होत्या ते कळत नव्हते..सुऱ्याच्या  पायाने होणारी खळबळ एवढाच काय तो आवाज बाकी सगळा आसमंत चिडीचूप झालेला..एव्हाना सुऱ्या खाडीत खांद्यापर्यंत पाणी येईल इतका पुढे आला..पायाखालच्या वाळूत घट्ट पाय रोवले..पण इतके रोवले गेले की कोणीतरी जणू पकडून ठेवलं असावे...सुऱ्या कित्येक वेळी या वेळेला येऊन गेला होता.. एव्हाना वाडीतल्या कोंबड्यानी आरवायला पाहिजे होते..पण तस काही होत नव्हतं.. विचारांच्या तंद्रीत सुऱ्याने खांद्यावरची पागली दोन्ही हातात पकडली आणि किंचित मागे वाकून समोर पाण्यात फेकली.. जाळ्याचा गोल फेरा बरोब्बर हवा त्या ठिकाणी पडला आणि पाण्याखाली अदृश्य झाला..थोड्या वेळात सुऱ्याच्या हाताला  खळबळ जाणवली..त्याने पागली अलगद ओढायला सुरुवात केली..नेहमीपेक्षा जड वाटली..मग हळूहळू किनारा गाठला..आता बेशुद्ध पडायची पाळी सुऱ्याची होती.एका फटक्यात बंपर म्हावर मिळालं होतं..ताजी फडफडीत मासळी ढिगाने मिळाली होती..सुऱ्या आनंदाने बेभान झाला..बस्स "परत एकदा जाऊ ..." तो स्वतःशीच पुटपुटला..
     ...नंतर तो जात राहिला..प्रत्येक वेळी ढिगाने मासळी...ताजी फडफडीत ,तजेलदार मासळी..आज काय त्याला सुमारच नव्हता...पागली फेकावी आणि खजिना लुटावा ...बस्स सुऱ्या आता बेभान झाला होता..आसमंतात फक्त त्याच्या पायांचा आवाज ,पाण्याचा आवाज आणि फडफडणारी ताजी मासळी या शिवाय दुसरे काही अस्तित्वातच नव्हते.. बाकी सगळी कडे निरव शांतता..आता सुऱ्याला समुद्राची गाज देखील ऐकू येत नव्हती .किनाऱ्यावर मासळीचा प्रचंड ढीग पडला होता...बस्स आता शेवटच जाऊन बघू...सुऱ्या परत पाण्यात निघाला..ढोपरभर पाणी ...कंबर भर पाणी..आता पाणी खांद्याला लागलं..बस्स आता फक्त पाय रोवायाचे आणि ....
     आणि..सुऱ्याचे पाय खोल रुतत चालले..आणखी खोल..कुठल्यातरी अघोरी शक्ती कार्यरत झाल्या ..सुऱ्याचे पाय आणखी खोलात जायला लागले आणि  आता मनाच्या डोहात भय उतरत गेले..
     किनाऱ्यावरचा मासळीचा ढीग आता डोंगराएवढा दिसू लागला..प्रत्येक मासा डोळे वटारून आपल्याकडे पहातोय आणि खदाखदा हसतेय असे भास होऊ लागले..अचानक किनाऱ्यावर माणसांची गर्दी दिसायला लागली..गोंगाट वाढत गेला..मासळीच्या ढिगाखाली एक प्रेत पडलं होतं..असेल साधारण चाळीस वयाच्या आसपास..गर्दी म्हणत होती ..जास्त म्हांवर मिळाल की तिथं थांबू नये..घात होतो..रम्याचा पण घातच झालाय..
    बापाचं नाव ऐकल आणि सुऱ्याला भूतकाळ आठवला ..सात आठ वर्षाचा होता तो...त्याचा बाप पण असाच  रात्री अवेळी मासे मारायला गेला होता.. जो गेला तो गेलाच दुसऱ्या दिवशी दुपारी त्याचे प्रेत सापडले मासळीच्या ढिगापाशी...
     भीतीची एक सणसणीत लहर  पायापासून मस्तकात गेली..जिवाच्या आकांताने सुऱ्या ने बापाच्या नावाने टाहो फोडला..सगळी खाडी शहारली..झाड थरारली..लेकराची  आर्त साद जणू त्या भूतकाळात विलीन झालेल्या सुऱ्याच्या बापाच्या आत्म्यापर्यन्त पोहोचली असावी..कदाचित सुऱ्याचा मूळ कुलपुरुष आतून हलला असावा..सुऱ्याच्या पायात बळ आले ..नकळत कोणीतरी आपल्याला उचलून घेत आहे असे त्याला जाणवू लागले..अगदी तसच जसे बापाने त्याला एकवीरेंच्या जत्रेत उचलून घेतले होते..
     कोणत्यातरी अगम्य शक्तीने त्याला अलगद किनाऱ्यावर आणून सोडले होते..सुऱ्या च्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या..
     आणि तिकडे वाडीत पहिला कोंबडा आरवला होता..सुऱ्या आता भानावर आला होता...म्हणजे मी घरातून किती अवेळी बाहेर पडलो...तो शहारला...थरारला...त्याला आठवलं जाग आल्यावर त्याने जे घड्याळ पाहिले ते वेळ दाखवत नव्हते तर अवेळ दाखवत होते...

-/© प्रशांत शेलटकर
      8600583846

No comments:

Post a Comment

मनातलं-#४

मनातलं -# -4 स्वसंवेद्य.. सखोल विचार केला तर आपण जिवंत आहोत म्हणजे मानवी मेंदूच्या मर्यादेत राहून केलेले आकलन आहे. सगळ्या जीवंत माणसांनी जिव...