मिरगातला कवी😌
म्हणावा तसा पाऊस
अजूनही पडत नाही
पेन घेऊन बसलो तर
काही केल्या सुचत नाही
कसे सुचेल तुम्हीच सांगा
लाईट जातो सारखा
सुखद गार झोपेलाही
कवी होतो पारखा...
रात्रभर डासांची मग
सुरू राहते पिपाणी
डास मारता मारता सांगा
कशी सुचावी गंमत गाणी
धुंद कसली हो कुंद ही हवा
कवी असा घामेजलेला
कवीच कशाला पेनही त्याचा
घामाने अस्सा भिजलेला
थोडं थांब मित्रा अरे
आता येईल पाऊस
कळ थोडी काढ आता
नको कोठे जाऊस
झर झर झर झरतील धारा
ढगांच्या मग झारीतून
सुचतील मग कशाही कल्पना
कवीच्या भिजल्या मनातून
फुलवून प्रतिभेचा पिसारा
मोर नाचेल मग कविचा..
पागोळी पडतात जिथे
भास होईल त्या मोदकांचा
कुणा "एक्स"च्या आठवणींनी
कवी होईल मग बेजार
पाऊस नव्हे, तिच्या डोळ्यांना
लागली आहे म्हणेल धार
पाऊस नको कविता आवर
असेच म्हणाल तुम्ही..
न वाचताच कविता त्याची
स्क्रोल कराल तुम्ही...
सबुर करा मित्रांनो
पाऊस येईल आणि जाईल
आषाढ सुरू होताच
कविता मग वाहून जाईल...
रोजच पाऊस रोजच चिखल
जगणे होईल मग नकोसे
धो धो वाहून जातील कवीचे
ते दर्द भरे उसासे
इथे फार गळते हो
काही तरी ओ करा ना
कवीच्या मागे त्याची बायको
रोजच करील मग ठणाणा
मग मिटून वही अन पेन
कवी येईल माणसांत
तुमची आमची सुटका होईल
त्या ओल्या क्षणांत
- प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment