सध्या आमच्या विवेकानंद नगरात वानरांनी खूप उच्छाद मांडलाय....
त्यावरून सुचलेली कविता...
🐵'वानरायण"🐵
आधी आला एक
नंतर आला काबिला
वानरांच्या मागे झाला
नगरकर वेडा खुळा
एक आला तेव्हा
कौतुक किती त्याचे
अय्या किती गोड म्हणून
फोटो काढीत त्याचे
बिलंदर तो कपिराज मग
भलताच धीट झाला
जाऊन रानात थेट
कुटुंबच घेऊन आला.
कुटुंबनियोजन कसले त्याला
उदंड झाली पोरे..
पोरांनाही मग पोरे झाली
धुमशान घालती सारे
झाडावर कधी माडावर
इकडून तिकडे धिंगाणा
फळे ,फुले तोडून नेती
मालक करती ठणाणा
आंबे ,चिकू ,केळी ,भोपळे
नासाडी किती सर्वांची
हवालदिल सर्व नगरकर
चिंता करती याची
कुणी वाजवती ढोल अन
कुणी बडवती डबे
कुणी बेचकीतून नेम धरतो
कुणी पिपाणी फुंकित उभे
तरी फिदीफिदी हासतो
अवघाची कपिवंश
कुत्सित त्यांचे हास्य करते
काळजालाच दंश...
थकले सगळे उपाय आता
काय करू रे देवा
पुढचा जन्म मिळो कपीचा
हाच करतो धावा..
अवघ्या नगरकराना मग
अवचित फुटल्या शेपट्या
या झाडावरून त्या झाडावर
मारू लागले ते उड्या...
झाडावरून उतरून वानरे
सोफ्यावर मग बसली..
तंगड्या टाकून टीपॉयवरती
आय पी एल पहात बसली
उडी मारता झाडावरून
मी खालीच पडलो..
जाग येताच कळले मला
मी पलंगावरून कोसळलो
कसली कसली स्वप्ने तरी
पडतात हल्ली हल्ली
वानरापायी फार परेशान
एक नंबरची गल्ली
एक नंबरच्या हनुमाना तू
आमच्या नवसाला पाव
मिळो न नाव आमच्या नगरा
हे वानरांचे गाव
निघून जावीत सगळी वानरे
त्यांच्या हिरव्या रानी
वानर मुक्त नगर व्हावे
प्रार्थना हीच तुझ्या चरणी
- प्रशांत शेलटकर
8600583846