आजकाल अस वाटतय बघ
वेड्यासारख.....
कधी हळव्या कातर क्षणी
सोबतीला असते तुझी
उबदार आठवण...
आठवत असते तुझे ते
कधी लाडिक कधी रागीट बोलणे
तू कशीही असो,
गुंतून राहतो मी तुझ्यात
भलताच पझेसिव्ह झालोय मी
तू शभरटक्के माझी असावीस
अस वाटू लागलंय मला हल्ली
तुला कोणाचाही स्पर्श
सहन होत नाही आजकाल
तुझ्या ओठांवर, तुझ्या गालावर
असावा वाटते केवळ माझा हक्क
शरीराची अनिवार ओढ मला
अस्वस्थ करते हे सत्यच
पण तुझ्या मनाची ओढ
त्याहून हजारपटीने जास्त...
संभोगाच्या आवर्तनाचा आनंद
क्षणिक तर नक्कीच पण..
सर्व काही उधळून टाकायची
भावना तर शाश्वतच ना???
कधी कधी वाटत,
माझं बीज रुजावे तुझ्या गर्भात
आणि आई होण्याचा तुझा आनंद
भरभरून पहावा तुझ्या चेहऱ्यावर
कधी वाटते,
भरभरून सुटावा पान्हा
तुझ्या स्तनातून अखंड...
आणि स्तनपान करताना
तू फिरवावेस तुझे हात
तुझ्या मांडीवर दूध पिणाऱ्या
तुझ्या बाळाच्या जावळातून
कधी वाटते,
तू रडावीस मोकळेपणाने
कोंडलेले तुझे श्वास मोकळे व्हावे
मनाच्या तळात खोलवर
दाबून ठेवलेले असंख्य हुंदके
मुक्त व्हावेत...
आणि आभाळ मोकळं होऊन
नितळ आकाश स्वच्छ दिसावं
तशी तू दिसावीस...
हसरी, निरागस, निष्पाप
जशी तू होतीस लहानपणी
आजकाल अस वाटतय बघ
वेड्यासारख.....
No comments:
Post a Comment