वाद्य आणि वादकांचे नातं इतकं अतूट असतं की त्या वाद्याचा स्वभाव त्या वादकात पण उतरतो..वाद्यांचा पण स्वभाव असतो नाही का !
तुम्ही तबलावादक पाहिलेत का ,बहुतेकांच्या डोक्यावर विपुल केशसंभार असतो.आणि जसे तबलावादकाचे हात तबल्यावर थिरकत असतात.तसेच त्याचे केसही थिरकत असतात..मुळात तबला हा बडबड्या माणसासारखा...एकदम मनमौजी..मैफलीत सर्वात जास्त भाव खाऊन जातो तो तबला...तिथे तबलावादक मनमोकळा हसू शकतो ...अगदी खुलेपणे दाद देऊ शकतो..मुळात चर्मवाद्य हीच मुळी extrovert स्वभावाची असतात..आणि त्यांचे वादकही ....तुम्ही तबला नवाज झाकीर हुसेन,ढोलकी वादक निलेश परब यांच्या भावमुद्रा पहा...किती प्रसन्न हसतात ते मैफिलीत
दुसर एक वाद्य म्हणजे हार्मोनियम.. हे वाद्य म्हणजे गायकाची सहचारिणीच जणू...एखादी पतिव्रता पतीच्या हो ला हो करते तशी हार्मोनियमही गायकाच्या प्रत्येक आलापीला , आरोह.अवरोहाला साथ देते...तुम्ही हार्मोनियम वादकाकडे लक्ष पूर्वक बघा..त्यांचं पूर्ण लक्ष गायकाकडेच असते...पत्नीने पतीची प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारावी तसे हे हार्मोनियमवादक गायकाच्या गळ्यातून येणाऱ्या प्रत्येक हरकती,जागा टिपत असतात...गायक आणि हार्मोनियम वादक यांचा असा हा सुखसंवाद अनुभवणे खूपच सुखद असते.
श्रोत्यांना समाधी अवस्थेत पोहोचवणारं आणखी एक वाद्य म्हणजे बासरी. थेट ईश्वराशी नातं जोडणारं हे वाद्य...मनाचा गाभारा सात्विक तेजाने उजळून टाकते..बासरीच्या रंध्रावरून बासरी वादकाची हळुवार फुंकर जणू आपल्याच वेदनांवर फुंकर घालते असं वाटत असते...बासरी वादकांचे अर्धोन्मिलित नेत्र कृष्णाची आठवण करून देतात..सर्वच बासरी वादकांच्या चेहऱ्यावर एक सात्विक हास्य विलसत असते..
व्हायोलिन एक गंभीर वाद्य आहे . तुम्ही व्हायोलिन वादकांचे चेहरे बघा..ते अत्यंत गंभीर असतात..असणारच ना व्हायोलिन हे वाजविण्यास अत्यंत कठीण वाद्य समजले जाते..व्हायोलिनच्या ताणलेल्या तारांवरून घरंगळाणारे स्वर निगुतीने उचलायचे आणि रसिकांसमोर पेश करायचे...Not a jock ...तेव्हा व्हायोलिन वादक गंभीरच जास्त भावतो...
व्हायोलिन चे दुसरे सख्खे भावंड म्हणजे सारंगी..
पण सध्या सारंगी दुर्मिळ झालीय..हे वाद्य पण अतिगंभीर आहे. पण या गंभीरतेला कारुण्याची छटा आहे..एक दर्द आहे.. चे दर्शन पूर्वी चित्रपटातील कोठयावरील मैफिलीत हमखास दिसायचे..आणि दुसरी जागा म्हणजे राष्ट्रीय दुखवट्या च्या वेळी दूरदर्शन वर. त्यावेळी सगळा दर्द सारंगी वादकाच्या चेहरयावर स्पष्ट पणे जाणवायचा...
जातिवंत वादक हा त्या वादयाशी इतका एकरूप होतो की त्या वाद्याचे गुणविशेष त्या वादकातही उतरतात. आणि त्या वाद्यालाही त्या कलाकारांचा चेहरा मिळतो..तबला म्हटलं की झाकीर हुसेन,सतार म्हटली की अमजद अली, बासरीचे सूर हरिप्रसाद चोरसियाची आठवण करून देतात...संतूर म्हटलं की शिकाऱ्यात बसून पहाडी धून छेडणारे पंडित शिवकुमार शर्मा आठवतात...
आपलं जिणं सुसह्य करणाऱ्या या वाद्यांना आणि वादकानाही सलाम.....
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846