Ad

Thursday, 20 August 2020

निर्वाण

निर्वाण

आलो कुठून अन जायचे कुठे
ते अद्याप  उमगत नाही..
अजून किती उरला प्रवास
ते मजला समजतच नाही...

हिशेब गतवर्षांचा आता
आताशा करवत नाही
उरले दिवस ते किती
थांग काही लागत नाही

केल्या कित्येक चुका
गुन्हा एकही केला नाही
हरलो जरी कित्येक वेळा
जिंकलो असे वाटलेच नाही

श्वास घेतला वेळीच मी
म्हणून मी मेलोच नाही
अन मेलोच नाही तरीही
जगलो असे वाटलेच नाही

माझ्याच जगण्याचे मी
हिशेब कधी ठेवले नाही
उधळावे आता मुक्तपणे
असे काही उरलेच नाही

कुठल्याच बखरीत माझी
नोंद कधी होणार नाही
नोंद घ्यावी असे काही
आयुष्यात मी केलेच नाही

अस्तित्वाचे माझ्या पुरावे 
ठेवण्यात हौस नाही
श्वासाला ठेऊन जामीन
जगण्याचा सोस नाही

-प्रशांत श.शेलटकर
8600583846
20/08/2020
07.45 P.M

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...