Ad

Sunday, 30 August 2020

चेतन

चेतन

चेतनेचा अंश एकदा
मनाशीच म्हणाला,
गंमत म्हणून यावं एकदा
माणसाच्या जन्माला...

माती पाणी उजेड वारा
घेतले मग सोबतीला
वाहन म्हणून घेतलं एका
माणसाच्याच स्पर्मला

म्हणाला चल आधी
एक आधी बीजांड शोधू
नऊ महिने नऊ दिवस
तिथे मस्त राहू..

चेतनेचा अंश तिथे 
मस्त मजेत राहिला
नऊ महिने झाले तसे
तो नव्या जगात आला..

नव्या जाणिवा नवे गंध
आता सगळे नवेच होते
नवी दृष्टी नवे स्पर्श
जिकडे तिकडे नवल होते

देहाची नवी नवलाई
अंश चेतनेचा हरखून गेला
देहातच असती सर्व सुखे
असेच तो समजून गेला

सुखाच्या झुल्यावर मग
बालपण झुलू लागले
बालपण सरता सरता
तारुण्य मग फुलू लागले

सर्व काही भोगावे असे
देहालाच आता वाटू लागले
सर्व काही लुटावे असे
देहालाच आता वाटू लागले

सारे सारे भोगून घे रे
देह चेतनेस म्हणाला
मीच स्वामी माझ्या देहाचा
देह चेतनेस म्हणाला

पण तारूण्य लागले
ओसरू हळूहळू
मग देह ही लागला
विझाया हळूहळू

चेतनेच्या अंशासही
मग तेव्हाच कळले
देह ही नश्वर माया
मोह पाहिजे टाळले

मग एका निर्वाण क्षणी
चेतनेने देह सोडला
लोक म्हणती मग
अरेरे , हा मेला...

जे होते विराट अनंत
ते अनंतात विलीन झाले
जे होते चेतनेचे,
ते चेतनेतच मिळाले...

-प्रशांत श.शेलटकर
8600583846
30/08/2020
07.30 p.m.
















No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...