देवा आत्ता कुठे तू
थोडा उमजू लागलायस
माझ्यातल्याच मला
आत्ता कुठे दिसू लागलायस...
कधी काळी मी देखील
लावल्या होत्या रांगा..
तुला नवसाची लाच द्यायला
काय काय मागितलं होत रे
मी पाव किलो पेढ्यांच्या बदल्यात,
बरं झालं तू ऐकलं नाहीस
नाहीतर मीच लावली असती
तुझीच बोली..नवसाच्या बाजारात...
मीच केलं असत तुझं मार्केटिंग
नवसाला पावणारा देव म्हणून
बरं झालं देवा...
तू नवसाला पावला नाहीस
बरं झालं सगळेच नकार
एकदम घातलेस पदरात..
आता मला दिसतात माणसं
जशी आहेत तशीच...
माणसं गोड बोलणारी
माणसं गोड दिसणारी
माणसं उलट्या काळजाची
माणसं बिनकाळजाची...
बरं झालं देवा...
तू नवसाला पावला नाहीस
नाहीतर मी ,
आशेचे एकेक रोपटे
लावीत गेलो असतो अन
नवसाचे पाणी देत गेलो असतो....
बरं झालं देवा ,
तू नवसाला पावला नाहीस..
नाहीतर तुलाच तारण ठेऊन
लोकं काय करत असतात..
टीचभर आयुष्याचा...
किती गर्व करत असतात...
बरं झालं देवा ,
तू नवसाला पावला नाहीस..
आता आकाश मोकळं आहे
ना कसली खंत आहे
तुझ्यातच सामावून
आता मी शांत आहे...
देवा आत्ता आत्ता कुठे तू
थोडा उमजू लागलायस
माझ्यातल्याच मला
आत्ता कुठे दिसू लागलायस...
-प्रशांत शेलटकर
8600583846