भय इथले....
तुझ्या भय कथांचेच
भय मला वाटते आहे
वाचुनच अंगावर माझ्या
दाटून काटा येत आहे..
तें अतृप्त आत्मे
रोज बसतात उशाशी
चाळवून झोप माझी
रडतात ओक्साबोक्षी
त्या पडक्या हवेल्या
त्या कोरड्या विहिरी
तें करकर दरवाजे
देतात मेंदूत शिरशीरी
भर मध्यरात्री कोणी
का उगाच भयाण रडते
ओसाड हवेलीत त्या
कोणी का उगाच हसते
घाबरवून लोकांना
का उगाच असे लिहिती?
इथे एकांती वाचताना
थरथर कापती मती
पुस्तकातली भय पात्रे
फिरतात भोवताली
बेफाम मुक्त सापळे
मागतात मलाच टाळी
फेकून पुस्तक तें करंटे
मीं चादर ओढून झोपतो
"थंडी लागते रे "म्हणोनी
एक सापळा कुशीत शिरतो
भय भीतीने मग त्या
बत्तीशी ही थरथरते
माझी की सापळ्याची?
तें मुळी न मजला स्मरते..
जळले मेले लेखक हे
कशास लिहिती भयकथा
की अतृप्त आत्मे यांच्या हस्ते
लिहितात त्यान्च्याच कथा?
मिटून मतकरी मीं
आता पुलं वाचतो आहे
भर मध्य रात्री मीं
खदाखदा हसतो आहे..
... प्रशांत 😄
No comments:
Post a Comment