समजदारीं....
हल्ली हल्लीच कळलं
की तीच प्रेम नाहीये माझ्यावर
एवढच कळलं मला की
ती जन्मदत्त समजदार आहे..
कल्पनेचा सुंदर कोष
माझ्याच भोवती विणलेला
अलगद सोडवत एकेक धागे
तिने मोकळा केला कोष
त्याच जन्मदत्त समजदारीने
क्रियेस प्रतिक्रिया..
राग, संताप, आरोप..
छे हो यातलं नाहीच काही
अगदीच निःशस्त्र केल मला
त्याच जन्मदत्त समजदारीने
स्वतःचे दुःख कुरवळाताना
तिच्याच दुःखाची मोहिनी पडून
माझे दुःख विसरायला लावलं
तिने त्याच जन्मदत्त समजदारीने
अगदी परवाच पावसात भिजलो
भिजले ओठ कानात कुजबुजले
सवय कर एकटे भिजायची
त्याच जन्मदत्त समजदारीने
आता छान वांझ झालोय
रुजून तर काहीच येणार नाही
याची दक्षता घेतलीय तिने..
त्याच जन्मदत्त समजदारीने
तिची ही जन्मदत्त समजदारी की
मजबुरी की आणखी काही?
प्रश्न मोकाट फिरतोय भोवती पण
समजून घेतोय मीही..
तिच्याच जन्मदत्त समजदारीने
-प्रशांत शेलटकर
8600583846