अकाली जोडीदार गेलेल्या स्त्रीचे भावविश्व..
एकटी..
गेलास सोडून एकटीला
एकांत हा छळतो आहे
आशेचा एकेक चिरा
आता निःशब्द ढळतो आहे
कशी पहावी स्वप्न
राख रांगोळी झाल्यावर
राखेतला फिनिक्स पक्षी
पुन्हा राख झाल्यावर
लढ म्हणून सांगायला
किती किती सोपं असतं
ज्याच जातं सर्वस्व
त्यालाच ते कळत असतं
भाऊ बहीण सगे सोयरे
कुंपणावरचे सरडे..
तीन दिवस रंग उधळतात
बांधावरचे तेरडे...
सगळंच गेलं वाहून
आता हिशोब कसला नाही
लढायचं तरी कशासाठी
त्याचा मेळ लागतं नाही
सण उत्सव समारंभ
बेदखल मी सगळीकडे
आता भोंवती वावरतात
वासनांध लोचट गिधाडे
गंथन जोडवी मंगळसूत्र
तटा तटा तुटली
तथाकथित संस्कृती ही
किती निर्लज्ज झाली
तू गेलास..सुटलास रे
मी इथे रोज मरते..
सावरली लोक म्हणतात
मी आतून झीजते
जेवढे शिल्लक श्वास
तेवढेच आता आयुष्य
आपल्याच माणसात मी
अबोल आणि अस्पृश्य
-प्रशांत