खेळ मांडीयेला..
इंटरनेट गेम चे adiction ही कोणा एका मुलाची समस्या राहिलेली नाही.ती सार्वत्रिक समस्या झाली आहे. त्यामुळे त्यावरचे सोल्युशन देखील सार्वत्रिक असलं पाहिजे.
तंत्रज्ञान बदलण्याचा वेग दहा वर्षावरून काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे त्या वेगाशी जुळवून घेणे मुलांना कठीण जात आहे तिथे पालकांची काय कथा? त्यामुळे पालक आणि मूल यांच्यात तंत्रज्ञानात्मक दुरावा हा अपरिहार्य आहे. आयटीयन्स पालकांना जे अवघड जाते तिथे सामान्य पालकांचे काय?
मुलांशी सवांद करायचा म्हणजे नेमकं काय करायचं ? हा प्रश्न बहुसंख्य पालकांसमोर आहे.तंत्रज्ञानाचा अपरिहार्य वापर ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे.आणि तीच मुलांची मुलांशी संवादाची भाषा आहे. समावयीन मुलांमधल्या चर्चा लक्षपूर्वक ऐकल्या तर हे लक्षात येईल की त्यांच्या चर्चा मोबाईल गेम्स बद्दल जास्त असतात.पालक आणि मूल यातील संवाद इथूनच तुटायला सुरवात होते.
मोबाईल गेम्स ही मोठी इंडस्ट्री आहे.कोणत्याही इंडस्ट्री प्रमाणे ती नफ्या तोट्याचे गणित पहाते. नामवंत गेम कंपन्या त्यांच्या रिसर्च सेक्शन मध्ये मानसतज्ञ नेमतात की जे मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्या प्रमाणे गेम्स डेव्हलप करत असतात. मग अशा गेम्सचे आकर्षण मुलांना वाटणे साहजिक आहे.पालकांचा मुलावर प्रभाव पडावा अस पालक वागतात काय? पालकच स्वतःमध्ये इतके व्यग्र असतात की त्यांच्या कामात मुलांचा व्यत्यय नको म्हणूम मूल अगदी लहान असल्यापासून मुलाच्या हातात एक खेळण म्हणून मोबाईल देतात.मग अशा पालकांची मुलाशी नाळ जुळायची कशी?
दुसरी बाजू अशीही आहे की,मोबाईल गेम्सला प्रभावी पर्याय काय? जो पर्यंत त्याला पर्याय मिळत नाही तो पर्यन्त मुले त्याकडे आकर्षित होणारच.मैदानी खेळ हा एक पर्याय आहे परंतु शहरात अशी मैदाने आहेत कुठे? आणि मैदानावर मुलांना आणायची जबाबदारी पुन्हा एकदा सार्वत्रिक बनते.समाजा पासून अलिप्त राहणाऱ्या व्यक्तिकेंद्रीत पालकांसाठी ही कठीण गोष्ट आहे.
इंटरनेटवर कोणा एकाची मालकी नाही.त्यामूळे शासनावर सुध्दा मर्यादा येत असतात.पण मोबाइल गेम्सच्या adiction मुळे तरुण पिढी बाद होत असेल तर शासनाने काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. मुलांना खेळायला मैदान उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि मुलांना मैदानापर्यंत नेणे ही पालकांची जबाबदारी आहे. समाजात लोकसंख्येच्या प्रमाणात मानसोपचार तज्ज्ञांची संख्या आहे का? ते माहीत नाही पण ती पुरेशी राहील याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. भविष्यात गेमपीडित मुलांची संख्या मोठी असेल त्या दृष्टीने एक वेगळा समुपदेशन अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रात समाविष्ट करावा लागेल मोबाईल adiction ची लक्षणे ओळखणे आणि त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे या बाबत पालकांचे समुपदेशन झालं पाहिजे.
एकुणात ही जबाबदारी पालक, शाळा आणि शासन अशी तिहेरी आहे.आपली मुलं आपल्यालाच वाचवायची आहेत.
- प्रशांत शेलटकर
8600583846