देव...
सगळे साले भास
म्हणे देव मला पावला
केले इतके पाप
तिथे देव कुठे थाम्बला..
केले कित्येक जप
केवळ मणी ओढले
नाम राहिले बाजूला
मी फक्त मणी मोजले
साफ गुंतलो प्रपंची
मोह तिळमात्र न सुटला
करून केवळ देखावा
मी बाजार भक्तीचा मांडला
न हाकलला कावळा
उष्ट्या हाताने कधी
शब्दांचे भरले ढग
अन शब्दांची केवळ नदी
शब्दांचे करून खेळ
मी अध्यात्म मस्त सजवतो
भला सात्विक म्हणुनी
ढोल माझेच मी वाजवतो
म्हणे अनुभूती आली
देव माझ्याशी बोलला
कोण रे तू देवाचा ?
असा खास लागून गेला
उतरवून ठेव ते खोटे
मुखवटे सगळे दांभिक
नको करू ते कर्मकांड
रहा स्वतःशी प्रामाणिक
देव ज्यांना उमगला
करुणामय हृदय त्यांचे
खरे स्थितप्रज्ञ ते साधू
चरण स्पर्शावे त्यांचे
@ प्रशांत 😌
No comments:
Post a Comment