Ad

Friday, 8 September 2023

निरामय

निरामय...

हल्ली माझा येशू झालाय..
उपहासाचे खिळे थेट 
अगदी मेंदूत मारले आहेत तरी
देवा क्षमा कर त्याना
ते जे काही करत आहेत..
ते त्यांचे त्याना कळत नाहीये..
असे सर्व मंगल पसायदान
मी मागत असतो आजकाल शांतपणे..

द्वेष आणि तिरस्काराचे..
विषारी साप सहज खेळवतात
काही सोशल गारुडी आजकाल
आणि त्यांच्या पुंगीवर डोलत बसतात
त्यानीच पाळलेली लाचार गांडूळे..
आणि हो त्या गांडुळानाही आजकाल
जातिवंत नाग असल्याची स्वप्ने पडतात
हरकत नाही ना पडू द्या त्याना ती स्वप्ने
हक्कच आहे तो सर्वाना अगदी गांडुळांनाही
मी मात्र मागत असतो पसायदान..
अगदी गांडूळांसाठीही तितक्याच आर्ततेने..

आजकाल मी बदललोय..
जग बदलण्यापेक्षा स्वतः बदलेले बरं..
प्रेम करणारे प्रेमच करणार
द्वेष करणारे द्वेषच करणार
राग करणारे रागच करणार
झोंबी कधी बदलत नसतात
झोंब्याना दुसरी बाजू नसते
झोंब्याना दुसरी दिशा नसते
झोंब्यांची वेगळी दशा नसते
त्यांचे मतपरिवर्तन होत नसते
मुदलात त्याना त्यांचे मत नसतेच
प्री-प्रोग्राम केलेला माईंड सेट
असतो फक्त त्यांच्या पाशी..
वळसा घालून मी पुढे जातो आजकाल
भवतु सब्ब मंगलम म्हणून..

क्रियेला प्रतिक्रिया दिलीच पाहिजे
अस काही नसते...
इट का जबाब पत्थर से
असंही काही नसते..
कोणाची तरी जिरवायची बौद्धिक खाज
आता विरून गेलीय..
का कोणास ठाऊक ?
अंतःकरणाची तळी
करुणेने भरून गेलीय..
सर्वे संतु निरामय भावना
अगदी काठोकाठ भरून आलीय
येशू,तथागत आणि ज्ञानेश्वर
यांनी अगदी पोटाशी धरलंय मला
आता अगदी शांत शांत वाटतय..

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...