Ad

Friday, 21 October 2022

लाखात एक देखणी...

लाखात एक देखणी...


पाहिले विशीत तिला
मी किती झालो दंग
पाहिले आताच तिला
उडाले ना सारे रंग...

रेशमी केस तिचे
किती रुपेरी जाहले
चेहऱ्यावर सुरकुत्यांचे
तळ किती हो पडले

मोहक मादक अदा
 तो बांधा  कमनीय
आताशा किती वाटते
 बघा किती हो दयनीय

बळे बळे तारुण्याला
ती धरू धरू पाहते.
थरावर थर मेकपचे
ती लावू लावू पाहते

परी ते दिसते किती
पहा पहा विचित्र
शोभा पाहताच ती
विस्फारले मम नेत्र

सखे ऐकशील का 
क्षणभर ग माझे
फेकून दे ग ते
भूतकाळाचे ओझे

जशी आहेस तशी तू
मान्य कर ग स्वतःशी
एकांती बोल ग 
बोल ना तू मनाशी

तुझ्यासमोर चालती
तुझे कौतूक सोहळे
पाठ फिरता तुझी
चेष्टाच करता सगळे

दिसणे हे क्षणिक असते
क्षण ते केवळ माया
असणे चिरंतन असते
ते पाहिजे जपाया

दिसो सुरकुत्या त्या
तुझ्या ग चेहऱ्यावरी
हसता प्रसन्न त्या
गायब होती झडकरी

दिसू दे तुझे जगाला
तेजस्वी बुद्धी वैभव
निथळू दे तुझ्यातून
नित्य वात्सल्य भाव

दिसुदे तुझ्यातली
बेलाग अफाट शक्ती
मग जडेल ग जगाची
तुझ्यावर ग भक्ती

मग उमजेल तुझे तुला
तू तुझीच स्वामिनी
नजरेत तुझ्या तूच
 लाखात एक देखणी

- प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...