मी एकटा नाही..
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
माझ्यात डावा आहे,अन उजवाही..
एक सनातनी ,एक पुरोगामीही
एक अखंड कोलाहल
माझ्यात चालू आहे कारण,
मी एकटा नाही...
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
येशू... बुद्ध ..कृष्ण
लेनिन आणि मार्क्स
कुणा एकाचे मंगळसूत्र मिरवत
एकांगी जगणे रुचत नाही
मला पाचही जण हवेतच सोबत ...
हे सोबत असले की जाणवतं
मी एकटा नाही...
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
माझ्यात गर्दी असली तरी
कळप-बिळप पसंत नाही मला
हत्तीचे-हरणांचे ,
कोल्ह्यांचे-लांडग्यांचे तसे
माणसांचेही कळप
पुष्ट लोकांचे कळप,
तुष्ट लोकांचे कळप
माजलेल्या लोकांचे कळप
गांजलेल्या लोकांचे कळप
मी मात्र कळपात रहात नाही
कारण मला माहित आहे
माझ्यातच एक कळप आहे
म्हणूनच ....
मी एकटा नाही..
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
कुणाच्या तरी ,वळचणीला रहाणे
अगदीच सुरक्षित...
कोणतातरी झेंडा घेणं
अगदीच सुरक्षित
प्रत्येक झेंड्याचे
वेगळे तत्वज्ञान
प्रत्येक झेंड्याला
त्याचा त्याचा सन्मान..
कित्येक झेंड्याची अनेक बेटे
माझ्यात ऑलरेडी आहेतच
म्हणूनच मी एकटा नाही...
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
बेफाम,अनावर गर्दी
वेगळ्या रंगांची
वेगळ्या ढंगाची
मोहक ,मादक, माजोरी गर्दी
अगदी पार क्षितिजापर्यंत...
माझी वैचारिक तटबंदी तोडून
आत घुसू पाहणारी..
आक्रमक बेभान गर्दी..
कधी मोह कधी भय दाटून येत
गर्दीत सामील होण्यासाठी
भय व्याकुळ त्या क्षणी
माझ्यातला येशू स्नेहाद्र सुरात
माझ्याशी बोलतो,क्षमा कर त्याना
ते जे काही करत आहेत ते कळत नाही त्याना..
.किंचित स्मित करून बुद्ध म्हणाला
बन स्वतःचा मार्गदीप स्वतःच
अत्त दीप भव ..अत्त दीप भव ..
विचारांचे सुदर्शन चक्र ..
मनात फिरायला लागते
आणि हृदयाच्या पिंपळपानावर
निवांत पहुडलेला योगेश्वर
तेच किंचित स्मित करत म्हणतो
कर्म कर फक्त कर्म कर..
.माझ्या खांद्यावर हात ठेवून
मार्क्स आणि लेनिन म्हणतात
बेटा कर्म कर पण समाजासाठी
स्वार्थी नको होऊस इतकाही
त्याच क्षणी जाणवतं मी एकटा नाही...
मी एकटा नाहीमी एकटा नाही
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
हो गर्दी आहे अनेकांची....-
प्रशांत शेलटकर 8600583846
No comments:
Post a Comment