पुढे काय होणार??????
या मालिका बघणे म्हणजे इतरांच्या घरात डोकावून पहाणे.. जे घराघरात चालते ते परत पडद्यावर काय पहायचे? हल्ली एक नवीनच ट्रेंड आहे. जवळपास प्रत्येक मालिकेत एक लहान तोंडी मोठा घास घेणारे एक लहान मूल असतंच.. ते काहीही बोललं तरी ते कान टवकारून ऐकायचं असत...बाकी मसाला तोच असतो..सासू सून, ..एकत्र कुटुंब...ती कारस्थाने...ते शह -काटशह..तो अश्रूपात.. ते अमृतपानाच्या पंगतीत देवांचे रूप घेऊन राहू आणि केतू घुसले होते ना तसेच कुटुंबात घुसलेले उपखलनायक...आणि शेवटी लांबलेला सत्याचा विजय पाहण्यासाठी आसुसलेले हजारो डोळे...
पूर्वी दूरदर्शन मालिकांचा शेवट पण दिमाखदार व्हायचा ...कारण लिमिटेड एपिसोड... त्यामुळे त्या मालिका शेवटाकडे जाताना गावसकरच्या निवृत्तीचा दिमाख होता.. दामिनी मात्र कपिलदेवच्या निवृत्ती सारखी रखडली होती..
आताच्या मालिका अमृत प्राशन केल्या सारख्या अमर होऊन आलेल्या असतात...संपतच नाहीत. मग त्या कंटाळवाण्या होतात.. कुठून सुरवात केली होती हे खुद्द लेखकालाच समजत नाही..टी आर पी साठी कथानकाला वाट्टेल ती वळणे दिली जातात..तीच तीच दळणे दळली जातात. खलनायकाने नायक अथवा नायकाला पिचून काढावे..अनेक एपिसोड धोबीघाटावर सुकत घातल्यावर वळणे देत देत मालिका शेवटाकडे आली आली आणि खलनायकाच्या अंत झाला की काय दुर्बुद्धी होते की बेंबीत बाण मारलेला रावण हा हा हा करीत पुन्हा जिवंत व्हावा ना तसे या खलनायकाला परत धुमारे फुटतात...
आणि आमचे भाबडे प्रेक्षक परत सरसावून बसतात...
पुढे काय होणार याची वाट बघत...
- प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment