पुनरपि....
रात्रीचा एक वाजलाय... जीवन धारा हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरच्या आय सी यु मध्ये मी बेडवर ...सलाईन चालू आहे...रक्त चढवलं जातंय...समोरच्या भिंतीवरच कॅलेंडर वाऱ्याने फडफडतय...बाजूलाच घड्याळ आहे... एकची वेळ दाखवतेय ते...आणि तारीख 21 जून 2022
......
रक्ताची तिसरी बॉटल लावली गेलीय..डोके आणि डोळे जड झालेत...अंधुकसे आठवतंय..कालचा अपघात...गाडी स्लिप आणि मी फेकला गेलो..डोक्याला मार...कोणीतरी इथे दाखल केलंय... अजून शुद्धीत आहे मी...
समोरच्या भिंतीवरच कॅलेंडर वाऱ्याने अजून फडफडतय...बाजूलाच घड्याळा ची टिक टिक चालू आहे..आता 4.30 झालेत ...आणि तारीख तीच 21 जून 2022...
........
आता श्वास लागलाय.. नाकाला ऑक्सिजन लावलाय...आजूबाजूला कसल्यातरी वेगवान हालचाली चालू आहेत..अगम्य वैद्यकीय भाषेतून डॉक्टर सूचना देत आहेत..मला कळत नाहीयेत त्या..डोळे जड झालेत..तरीही भिंतीवरचे घड्याळ दिसतय...वेळ समजतेय...सहा वाजून दहा मिनिटं झालीत..खिडक्यांची तावदाने थोडी उजळ झालीत.. आता उजाडेल अस वाटतय..
.....
खूप वेळ नजर घड्याळाकडेच लागलीय...तितकेच वाजलेत...मोठा काटा दहा वर...छोटा काटा सहावर... कॅलेंडर ची फडफड थांबलीय..तावदाने तशीच उजळलेली थोडीशीच... सगळंच फ्रीज झालंय... डॉक्टर आणि नर्सेस स्ट्याच्यु स्ट्याच्यु खेळतायत का??...
.....
आता फक्त घड्याळ दिसतंय..तीच वेळ सहा वाजून दहा मिनिटे...बाजूचे कॅलेंडर..21 जून 2022...
किती वेळ तीच तारीख तीच वेळ??? काळ फ्रीज झालाय की माझ्या जाणिवा फ्रीज झाल्यात..
ते भिंतीवरचे घड्याळ आणि ते कॅलेंडर..अनंत काळ तीच तारीख आणि तोच दिनांक दाखवणार का?
.....
आता काहीच आठवत नाहीये..
फक्त ते घड्याळ आणि ते कॅलेंडर...बस्स सगळ्या मिती एक झाल्यात...लांबी...रुंदी ...उंची विलय झालाय केव्हाच..आता मी आइन्स्टाइनच्या चौथ्या मितीच्याही पलीकडे ....काळाच्या ही पलीकडे...घड्याळ अंधुक होत जातंय..
....
हा भास की स्वप्न..की कालातीत अनुभव..की हा प्रकाशवेग..इकडे तिकडे सगळीकडेच मी आहे...एकाच वेळी सूक्ष्म एकाच वेळी भव्य..देहाची काही गरजच नाहीये...अगदी शिवोहं अवस्था.. जाणीव आहे आणि नाहीही...अंधार आणि प्रकाश सत्य काय? एकाचा विलय की दुसऱ्याचा उदय...दोन्ही सत्य की दोन्ही असत्य...
......
चल परत...एक अनाहत नाद..
......
भिंतीवरच घड्याळ बदललेलं..त्याची डिझाइन बदललेली.. त्याची टिकटिक ऐकू येतेय...चक्क काटे फिरत आहेत..आठ वाजून सहा मिनिटे झालीत..खिडक्या आता लख्ख उजळल्यात... स्ट्याच्यु झालेले डॉक्टर आणि नर्सेसचे पुतळे प्राण भरल्यासारखे हळू लागलेत ...त्यांचे चेहरे उजळेत..मला आता अगदी फ्रेश वाटतय...इतकं फ्रेश की जणू मी नवीन जन्मच घेतलाय.. सगळं काही नवं नवं...समोरच्या भिंतीवरचे कॅलेंडर पण अगदी नवं..तारीखही नवीन...01 मार्च 2036....
सगळं काही नवं...मी नवा आणि मला कुशीत घेणारी माझी आईही नवीनच....
-प्रशांत शेलटकर
8600583846