प्रिय कुकु...
हो मी तुला कुकुच म्हणायची...ते कुक्कुटराज वगैरे आपले कडकनाथ आजोबा म्हणायचे तुला ...त्यांचा तू लाडकाच होतास ना रे...का नाही असणार .!.तू होतासच तसा... अगदी राजबिंडा..तुझी रंगीत पिसं.. डोक्यावरचा लाल भडक तुरा..तुझ्या पायासारखे पाय अख्ख्या पोल्ट्रीफार्म मध्ये नव्हते कोणाचे..मक्याच्या दाण्याच्या रंगाचे तुझे पाय आणि ती हस्तिदंती नखे अहाहा...!! आणि तुझी चाल तर एखाद्या सैनिकासारखी...
पण कुकु, मी भाळले ते तुझ्या स्वभावावर..तू इतर कोंबड्यांसारखा लोचट नव्हतास..दिसली कोंबडी की धर फेर तिच्याभोवती... अस नव्हतं तुझं ...तू वेगळाच होतास... कितीजणी तुझ्या रंगरूपावर भाळून तुझ्या मागे पुढे करायच्या...पण नाही ..........तुझा जीव या झिरमीत अडकलेला...हे झिरमी नाव आपल्या कडकनाथ आजोबांनीच दिलेलं बरं.. मी एका जागी बसून झोपा काढते म्हणे ...हो मी असते एका जागी बसून , मला नाही आवडत इतर कोंबड्यां सारख इथ तिथं चोंबडेगिरी करायला..त्यापेक्षा एका जागी बसून तुझ्याकडे बघत रहाणे किती सुखद..मी अस तुझ्याकडे पहात राहिले की आजूबाजूचं कुक्कुटविश्व अदृश्य व्हायचे... मी तुझ्यात आणि तू माझ्यात हरवून जायचो..तुझ्या उबदार पंखाखाली मी अगदी धुंद व्हायची...ते भारलेले क्षण कधीच विसरू शकत नाही मी..किती वेगळा होतास रे तू..तू बंडखोर होतास..प्रत्येक कोंबड्याने पहाटेच आरवल पाहिजे असा सगळ्या कुक्कुटविश्वाचा नियम तू धुडकावून लावायचास... रात्री अपरात्री केव्हाही मनसोक्त आरोळी ठोकायचा तुझा स्वतंत्र बाणा.. मला आवडत होता तरी जगाला असले बंडखोर आवडत नसतात कुकु..परंपरेच्या सुरक्षित चौकटीत रमतात सगळे रे कुकु ...माणूस काय आणि आपण काय... सगळे एका माळेचे मणी...रात्री अपरात्री आरवतो म्हणून तुला अपशकुनी ठरवलं रे मालकांनी...आणि एक दिवस.....
कुकु , आठवतो तो रे दिवस...व्हॅलेंटाईन डे होता तो..तू माझ्यासाठी तुझंच एक सप्तरंगी पीस माझ्या पंखात माळलं होतस ..अगदी पहाटे...पहाटे...
.... म्हणाला होतास...झिरमे माझं काही खरं नाही..बंडखोरी म्हणजे सुळावरची पोळी...आज असेन तर उद्या नसेन...कदाचित आजच्या सुर्योदयालाच... तुला आठवत कुकु?... मी तुला बोलू दिलं नव्हतं..अभावितपणे माझी चोच तुझ्या चोचीवर इश्श .....किती लाजले होते मी तेव्हा आणि तुही म्हणाला होतास झिरमे लाजलीस की तू छान दिसतेस... पिसापिसांत माझ्या रंग भरले होते तेव्हा....
आयुष्यातल ते पहिले चुंबन होतं कुकु...तेही व्हॅलेंटाईन डे ला ..दोन प्रेमी जीवांना आणखी काय हवं कुकु..??
पण कुकु , सुखं थोडी दुःख भारी दुनिया ही भली बुरी हेच खरं..तुझ्या बंडखोरीची शिक्षा तुला त्याच दिवशी मिळावी ना...जाताना पण किती शांतपणे गेलास तू.. न कसली धडपड ना कसली तडफड...कुक्कुटविश्वातला व्हॅलेंटाईनच तू ...ज्या सकाळी तू गेलास त्या सकाळी क्षितिजाने जणू तुझे रंग चोरले होते... माझा कुकु जणू आभाळात सामावून गेला होता ..
आणि नेमके त्याच दिवशी पहाट वाऱ्याने तुझे एक रंगीत पीस उडत उडत माझ्यापाशी आले आणि जणू सांगून गेले " झिरमे मी पोहोचलो बरं का"...
तुझे ते पीस पंखाखाली घेऊन दिवस काढते आहे कुकु...आता कधी तरी रात्री अपरात्री तुझ्या आरवण्याचे भास होतात...मी दचकून उठते...बस्स तुझी जागा रिकामी असते..
तुझीच...
झिरमी
©प्रशांत शशिकांत शेलटकर
रत्नागिरी
😊😊😊😊
No comments:
Post a Comment